जळगाव: राजकारणात कशा पद्धतीने टिकून राहावं लागतं? राजकारणात काय केलं पाहिजे? यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. सध्याच्या राजकारणात धावणाऱ्या घोड्यावरच बीट लावली जाते. निवडून आल्याशिवाय माणसाला किंमत नाही, असं प्रचलित राजकारणावरील जळजळीत भाष्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर झालेल्या ईडीच्या कारवाईवरही भाष्य केलं.
आम्ही मतदारांचे भिकारी असून आम्हाला सर्वांचेच मत आवश्यक आहे. निवडून आल्याशिवाय माणसाला किंमत नाही. त्यामुळे राजकारणात जो जिता वही सिकंदर असतो असं सांगतानाच सध्या राजकारणात धावणाऱ्या घोड्यावरच बीट लावली जाते, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने काल धाड मारली. त्यावरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे. ईडी ही एक वेगळी एजन्सी आहे. ईडीचे अधिकार वेगळे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. कुणावर ईडीची कारवाई झाली असेल तर विरोधक केवळ यंत्रणांचा गैरवापर असे उत्तर देतात, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला.
हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर ते बिनधास्त बाहेर येतील. ज्यांनी काही केलं नाही ते देखील बाहेर आलेच. मात्र जामीन मिळण्यासाठी आतमध्ये जावेच लागते, असं विधानही त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचे अपघात होत आहेत. जयकुमार गोरे, योगेश कदम, धनंजय मुंडे आणि बच्चू कडू यांचा अपघात झाला. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. माझ्या ड्रायव्हरच्या हातून एकदाच अपघात झाला होता.
मात्र गेल्या दहा वर्षापासून माझ्या वाहनाचा कुणाला धक्का देखील लागला नाही. सद्यस्थितीत पुढाऱ्यांचे जास्त अपघात होत असून कार्यक्रमानिमित्त पुढाऱ्यांना धावपळ करावी लागते. मात्र नियम पाळून चालले तर त्याचा फायदा होतो, असा सल्लाही त्यांनी दिला.