जळगाव: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मी भगोडा नव्हतो. मी त्यांना सांगूनच बाहेर पडलो, असं सांगतानाच अजित पवार यांनी त्यांची चूक सुधाली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची चूक सुधारली. पण उद्धव ठाकरे यांनी सुधारली नाही. त्यांना ग ची बाधा नडली, असा हल्ला गुलाबराव पाटील यांनी चढवला. ते जळगावमध्ये मीडियाशी संवाद साधत होते.
ज्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही. मात्र योग्य वेळी आपण उत्तर देऊ. राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी आपण 40 पैकी 33वा आमदार म्हणून मी शिंदे गटात सहभागी झालो होतो. जाताना आपण त्यांना सांगून आलो होतो. आपण भगोडे नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
राजकारणात जे घडतं होतं त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असंही पाटील म्हणाले.
अजित पवार यांनी सकाळी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांनी त्यांची चूक दुरुस्त केली होती. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते. त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांना आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते.
आमच्या बंडावेळीही ते शक्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची ऐकण्याची मानसिकता नव्हती. कधी कधी खूप ग खूप नडतो आणि त्याचाच हा परिणाम आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
राजकारणात काम करताना तुम्ही कितीही चांगले काम केले तरी तुम्हीला विरोधक असतातच. शरद पवार हे अत्यंत पॉप्युलर नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लोकप्रिय नेते आहेत. पण या दोन्ही नेत्यांनाही विरोधक आहेत.
त्यामुळे विरोधक काय करतात आणि काय नाही याचा अधिक विचार न करता आपण आपलं काम करत राहीलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान, जळगावमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना जिल्ह्यात नंबर वन करायची आहे, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.