मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मागोमाग एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा धडका सुरू केलाय. आज (12 ऑगस्ट) त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयामुळे राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण होईल, असं मत त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त केलं जातंय. या निर्णयानुसार वारणा प्रकल्पाच्या मंजूर बिगर सिंचन तरतूदीतील विनावापर 6 टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त जत तालुक्याला मिळेल.
जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास बिगर संचिन तरतूदीतील विनावापर 6 टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचे आदेश दिलेत. याबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली. गेली अनेक वर्षे जत तालुक्याची ओळख सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून आहे. या जत तालुक्यातील 65 गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 12, 2021
आताच्या एकूण 6 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानं जत तालुक्यातील पाणी प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येईल. जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास हे पाणी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी होती. त्याअनुषंगाने आज हा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे विस्तारीत म्हैसाळ योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न राजारामबापू पाटील यांनीही पाहिले होते. तेच स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत आहे. याचा मला व सांगली जिल्हावासीयांना मोठा आनंद आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.