सोलापूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या एका माजी आमदाराने बॅनरबाजी केली आहे. त्यावर त्याने भावी खासदार असा स्वत:चा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे हा माजी आमदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पत्ता कट होणार की काय? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूरबाबत केलेल्या विधानाने या चर्चांना बळ मिळालं आहे. त्यामुळे या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आमदार जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीत बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत तरी काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवू. अमोल कोल्हे तुम्हाला (पत्रकारांना) बोलले असतील तर मला माहिती नाही, माझ्याशी त्यांची चर्चा झालेली नाही. अमोल कोल्हे हे आमचे उत्तम उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत खूप चांगले काम केले आहे. त्याव्यतिरिक्त आणखी काही चांगले उमेदवार शिरूर मतदारसंघात आहेत ज्यांचं तिथं चांगल काम आहे, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे कोल्हे यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपचा अलीकडे हाच प्रॉब्लेम झालाय. अनेक लोकं राष्ट्रवादीतून भाजपात गेलेत. त्यामुळे निष्ठावंतांना कुठे बसवायचं आणि नव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून तिथं गेलेले लोकांना कुठं बसवायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. पण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गटातून भाजपतं जी लोकं गेलीत या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलली गेले आहेत, ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे, असं ते म्हणाले.
सोलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात तात्पुरते गेले आहेत. शिंदे गटाची जो पर्यंत सत्ता आहे. काही सोयी सवलती मिळतील म्हणून शिंदे गटात गेले आहेत. तिकडे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही. एका कार्यकर्त्यांने मला सांगितले, साहेब सहा महिने जातो. निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत येतो, असा दावा त्यांनी केला.
भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधानांना कुस्तीपटूच्या आंदोलनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. जगात ज्या महिलांनी नाव कमावलं, पदक मिळवलं त्यांना खाली रस्त्यावर पाडणं, पोलिसांनी तोंडावर पाय ठेवणे याचा देशातील खेळाडू आणि खेळावर प्रेम करणारी जनता निषेध करत आहे. एका बाजूला संसदेचं उद्घाटन करता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन चिरडता. संसदेचं उद्घाटन सुरु असताना आंदोलन चिरडलं तर मीडिया दाखवणार नाही यासाठी हे खटाटोप केले. पण जनता त्यांच्या पाठीशी राहिली, भाजपने स्वतःहून कार्यक्रमला गालबोट लावून घेतलं, असं ते म्हणाले.