सांगली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर खोचक टीका केली आहे. सत्ता गेल्यावर काहींना भ्रमिष्टपणा येतो. काहींचा तोल जातो. चंद्रकांतदादांचं नक्की काय झालं याचं संशोधन करावं लागेल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. सत्ता गेल्यावर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो. तर काही लोकांचा तोल जातो. चंद्रकांतदादांचं नेमकं काय झालं याचं संशोधन करण्याची गरज आहे. एकेरी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हती. दुर्देवाने त्यांनी वापरली. पवारांचं बोट पकडून मी राजकारणात आलो असं जेव्हा मोदी म्हणतात तेव्हा मला वाटतं हा एकेरीपणा त्यांनी नरेंद्र मोदींबाबत खासगीत वापरला असावा. त्यामुळेच त्यांना सवय लागलेली दिसते, असा चिमटाही त्यांनी काढला.
आघाडीचा पराभव करा, तुम्हाला सोन्याचा मुकूट देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरही जयंत पाटील यांनी मिष्किल भाष्य केलं. त्यांना सोन्याचा मुकूट काही द्यायचाच नाही. त्यामुळे घोषणा करायला काय जातंय? मुकूट द्यावाच लागणार नाही याची त्यांना खात्री असावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
सर्वत्र स्वतःचे फोटो प्रकाशित करून मोफत लस उपलब्ध करून दिल्याचा केंद्र सरकारने आव आणला आहे. मात्र इंधनावर अधिक टॅक्स लावून जनतेकडून पैसे उकळल्याची बतावणी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्रीच करतात हा भाजपचा खरा चेहरा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
फडणवीसांच्या नेतृत्वातील डाव त्यांच्यावरच उलटेल; छगन भुजबळांचा इशारा
अजित पवारांना या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही; रामदास आठवेलंचं मोठं विधान
सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा; लोढेंच्या बढतीमुळे सावंत नाराज?
(jayant patil reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar)