अहमदनगर : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रकल्प जून 2022 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलंय. तसेच या निळवंड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली असून आणखी निधी लागला तर तोही देऊ, असंही त्यांनी नमूद केलं. ते आज (22 मे) अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात देखील सोबत होते (Jayant Patil say will complete Nilwande project upto June 2022 in Ahmednagar).
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, “यावर्षी निळवंडे प्रकल्पासाठी 500 कोटींचा निधी दिलाय. जून 2022 पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण करणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी वाढीव मदत लागली तर तीही देऊ. राज्यसमोर अनेक अडचणी असल्या तरी निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्याला आमचं प्राधान्य आहे. कालव्यांची कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटेल.”
निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाचा आज जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil यांच्यासमवेत आढावा घेतला. निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या मुख्य कालव्यावरील पूर्णत्वास आलेल्या आढळा जलसेतू कामची पाहणी करून सूचना केल्या. pic.twitter.com/nD5DXGxDsx
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 22, 2021
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला निधी मिळाल्यानं गती आली. निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्णत्वाकडे आहे. आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यासह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात बांधलेल्या पुलाची पाहणी केली आणि कामाबाबत समाधान व्यक्त केलंय.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. जेव्हा जेव्हा आघाडी सरकारला संधी मिळाली तेव्हा तेव्हा आम्ही या कामांना गती दिली, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. तसेच आमच्या पाठपुराव्याने निधी जास्त मिळाला आणि त्यामुळे 2022 चं पाणी या कालव्यांमधून सुरू होईल, अशी आशाही व्यक्त केली.
अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाच्या कामावरून श्रेय वादाचा कलगीतुरा नेहमीच रंगत असतो. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित कालव्यांची कामे मार्गी लागल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाणी टंचाई संपेल हे मात्र नक्की.
जयंत पाटील म्हणाले, “समुद्रातील ओएनजीसीच्या कामात महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण नाही. चक्रीवादळाचा इशारा या कंपनीला 8 दिवस अगोदर दिला होता. तरीही कंपनीने कर्मचारी बाहेर काढले नाहीत. याची चौकशी केली जाईल. प्रत्येक गोष्ट राज्य सरकारवर टीका करण्यासाठी वापरली जाऊ नये. यामुळे नेमकं काय घडलं याचा तपास आता पोलीस अधिकारी करतीलच.”
“दरम्यान केंद्र सरकारच्या हातात असलेलं लसीकरणाच नियोजन ढासळलेले असून ज्यांना पहिली लस दिली त्यांना दुसरी लस देण्याचं नियोजन का नाही?” असा सवाल जयंत पाटील यांनी यावेळी केलाय. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर केंद्र सरकारचं नियोजन असल्यानं जगात लस निर्यात करण्यावर भर दिल्यानं त्याचे आज दुष्परिणाम दिसतायत, अशी टीका जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केलीय.
“दरम्यान कोकणात चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं असलं तरी मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यावेळी उपाययोजना लवकर सुरू केल्या आहेत. यासाठी बाहेरून मनुष्यबळ उपलब्ध केलंय. लवकर सगळं सुरळीत होईल,” असा विश्वास उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Jayant Patil say will complete Nilwande project upto June 2022 in Ahmednagar