नांदेड : नांदेड (Nanded) शहरातील पूरबुऱ्हाणनगर येथील एका ऑटो चालकाचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालायं. ईपीएफओत त्याने 194 क्रमांक मिळवत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र काैतुक होतंय. नांदेड शहरातील पिरबुऱ्हाण नगर येथील राहिवाशी जाफर पठाण हे ऑटोचालक (Auto driver) आहेत. त्यांना चार मुले असून आजही ते ऑटो चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ऑटो चालवून त्यांनी मुलांना शिकवले आणि त्यांचा मुलगा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. मुले लहान असतांना त्यांच्या शिक्षणासाठी (Education) देखील जाफर पठाण यांच्याकडे पैसे नव्हते. नातेवाईक, मित्राची मदत आणि उसने पैसे घेऊन त्यांनी मुलांचे सर्व शिक्षण केले.
जाफर पठाण यांचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा जुनेद पठाण याने हे यश मिळवले. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नांदेड शहरात झाले. बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिकून त्याने अभियांत्रिकी केली. त्याला मुंबई येथील एका कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, हे आपले ध्येय नाही हे जुनेदला समजले आणि त्याने नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. चार वर्षे अभ्यास करुन लोकसेवा आयोगाच्या इन्फोर्समेंट ऑफिसर, अकाउंट ऑफिसर पदासाठी त्याने परीक्षा दिली.
मुंबई शहरामध्ये हातात असलेली नोकरी सोडून देत जुनेद थेट स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. सातत्याने चार वर्ष अभ्यास करून यूपीएससी परिक्षेत जुनेद पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. लहानपणी शाळा आणि शिकवनीला पैसे नसायचे. तेव्हा पाच रूपये दहा रुपये जमा करून आपण फी भरायचो त्या आठवणी जुनेदने सांगितल्या. फक्त अभ्यासाचा जोरावरच आपण हे यश मिळवल्याने त्याने सांगितले. आज संपूर्ण नांदेड शहरामध्ये जुनेदचे आणि त्यांच्या वडिलांचे काैतुक केले जात आहे.