कोल्हापूर : कोल्हापुरातील घटनेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. त्यांनी राज्यातील तरुणांना कायदा हाती न घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही, असंही आश्वासन दिलं आहे. गृहमंत्र्यांच्या आवहनाआधी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सर्वात मोलाचं आवाहन केलं. त्यांनी सर्वांना शांततेत आपले प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. त्यांनी कोल्हापूर नागरिकांना आपला जिल्हा हा समतेचा सल्ला देणारा जिल्हा असं सांगितलं. आपल्याला आपल्या संविधानाला कोणताही डाग लागू द्यायचा नाही, अशी भावनिक साद कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांकडे घातली.
“आपला हा प्रदेश समतेचा सल्ला देणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे आपल्या सर्वच नागरिकांना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धर्म, पंथाच्या, जातीच्या नागरिकांना मी आवाहन करतो की, आपण सर्वांनी कृपया संयम बाळगावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर ज्या गोष्टी व्हायरल होत आहेत त्यावर विश्वास ठेवण्याची चूक करु नये. संपूर्ण जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे”, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
“आपला देश लोकशाहीचा पुरसकर्ता आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान देशाबाहेर गेल्यावर सुद्धा आपल्या देशाला लोकशाहीची जननी आहे, असं म्हणतात. त्यामुळे या लोकशाहीवर आधारित असणाऱ्या देशाला, आपल्या संविधानाला कोणताही डाग लागू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे”, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं.
“सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी सुद्धा आपल्या सर्व अनुयायांना, आपल्या कार्यकर्त्यांना समाजात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी प्रयत्न करण्याचं पूर्णपणे आवाहन करावं. आपणही त्यांना पाठबळ द्यावं, असं मी आवाहन करतो”, असं राहुल रेखावार म्हणाले.
“आपल्याकडे पुरेसा बंदोबस्त सुद्धा आहे. आपण सर्वच घटक, संस्थांवर लक्ष ठेवून आहोत. आज जी दुर्देवी घटना कोल्हापूर शहरात घडली, ती घटना परत घडू नये यासाठी संपूर्ण तयारी प्रशासनाने केलेली आहे. आपण सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की, आपण आपल्या समाजातील कोणताही प्रश्न असो तो आपण शांततेने समोपचाराने सोडवू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेवून कोणताही प्रश्न कधीही सुटत नाही. उलट तो आणखी गंभीर होता”, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
“मी सर्व धर्माच्या तरुणांना आणि त्या तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्यांना सुद्धा माझं आवाहन आहे की, आपण सर्वांनी चर्चेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवावेत. कायदा अतिशय सक्षम आहे. कायद्यामधील तरतुदी अतिशय सक्षम आहेत. आपण कोणत्याही प्रश्नाचं निवारण करु शकतो”, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
“अनेक प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित होते ते सुद्धा मागील दोन ते तीन वर्षांमध्ये चर्चेच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. जे उर्वरित प्रश्न आहेत ते सुद्धा आपण सोडवू. आपण सर्वांनी संयम राखणं जरुरीचं आहे”, असंही जिल्हाधिकारी म्हणाले.
“सध्या स्थितीत आपण पाहतोय, एक तासात सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्यामुळे आपण शासनाला अहवाल दिला आहे. शासनाकडून कारवाई होईल. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, कोणत्याही अफवांवर आणि सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
“मी वेगवेगळ्या समाजाच्या घटकांना आज संध्याकाळी कार्यालयात चौकशीसाठी बोलवत आहे. सर्वांशी चर्चा करुन कोणते प्रश्न असतील, गैरसमजुती असतील तर त्या दूर करण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करु. लोकप्रतिनिधींशी सुद्धा माझं बोलणं झालंय. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं वचन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती पूर्पपणे नियंत्रणात ठेवू”, असं जिल्हाधिकारी म्हणाले.