कोल्हापूर : कोल्हापूरच्या बिंदू चौकात (Bindu Chowk) आज चांगलंच वातावरण तापलं होतं. महाडिक गटाकडून देण्यात आलेलं चॅलेंज काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्वीकारल्यानंतर बिंदू चौकात रात्री चांगलाच गोंधळ बघायला मिळाला. दोन्ही गटाचे नेते आज बिंदू चौकात दाखल झाले. महाडिक गटाने सतेज पाटील यांना बिंदू चौकात येण्याचं चॅलेंज दिलेलं. त्यामुळे त्यांच्या गटाकडून आमदार ऋतुराज पाटील बिंदू चौकात दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटात संघर्ष होणार नाही, यासाठी काळजी घेतली. या दरम्यान माजी आमदार अमल महाडिक यांचीही भूमिका समोर आलीय. बिंदू चौकात दोन्ही गटांना पोलिसांनी रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण वातावरण निवळल्यानंतर ऋतुराज पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महाडिक गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावी, ते आमचं आव्हान आहे. प्रश्नाचे उत्तर देता येत नाहीत म्हणून ते अशी पळवाट काढत आहेत. सत्तेचा गैरवापर करून 29 उमेदवार अपात्र ठरवले. त्यांनी आजच आव्हान देणारी पोस्ट का टाकली?” असा सवाल ऋतुराज पाटील यांनी केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या चांगल्या दिवशी अशी चॅलेंज करून दिशाभूल करायचा प्रयत्न केला. सत्तेचा वापर करून मला दसरा चौकात अडवण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला कसलीही भीती नाही. मी आजही जाहीरपणे सांगतो. महाडिक कंपनी भ्याली…भ्याली…भ्याली”, असा शब्दांत ऋतुराज पाटील यांनी हल्लाबोल केला.
“तुमच्यामध्ये धमक होती तर आम्ही येण्याआधी का पळाला? धमक असती तर बिंदू चौकात थांबला असता. सतेज पाटील यांनी इथं येण्याची गरज नाही. आम्ही पुरेसे आहोत. महादेवराव महाडिक येतील तेव्हा आम्ही पुन्हा ताकतीने येऊ. खासदार धनंजय महाडिक यांनी काय टीका केली यावर बोलायचं नाही. त्यांची रेष पुसण्यापेक्षा आमची रेष मोठी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय”, असा घणाघात ऋतुराज पाटील यांनी केला.
“आम्ही बंटी पाटलांची वाट बघतोय. दुसरे कोण येतील किंवा जातील ते आम्ही बघत नाही. बंटी पाटील घाबरले. ही कारखान्याची निवडणूक आहे. व्यक्तीशा निवडणूक नाही. मी त्यांना आव्हान दिलं होतं. पण ते आले नाही. आम्ही घाबरलो नाही तर तेच घाबरले आहेत. त्यांची नीतीमत्ता कोठे आहे, म्हणून स्वतः आले नाहीत. ज्यावेळी डी वाय दादा विचारतील त्यावेळी महादेवराव महाडिक समोर येतील”, अशी प्रतिक्रिया अमल महाडिक यांनी दिली.