कोल्हापूर | 21 ऑक्टोबर 2023 : कोल्हापूरच्या राजकारणात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचा गट यांच्यात नेहमी संघर्ष होत असतो. दोन्ही गट एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दोन्ही गटांमध्ये नेहमी संघर्ष बघायला मिळतो. काही वर्षांपूर्वी सतेज पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात घट्ट मैत्री होती. पण नंतर काही गोष्टी घडल्या ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये एकमेकांच्या विरोधात रोष निर्माण झाला. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीला दोन्ही गटात तुफान संघर्ष बघायला मिळतो. गोकुळ दूध संघाच्या सार्वजनिक बैठकीला तर अक्षरश: खुर्च्यांची तोडफोड होईपर्यंत गोंधळ होतो. पण आज कोल्हापुरात डोळे दिपवणारं दृश्य बघायला मिळालं.
कोल्हापुरात आज अनोखं दृश्य बघायला मिळालं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक हे एकाच मंचावर बघायला मिळाले आहेत. त्यामुळे या घटनेची कोल्हापुरात जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी एकत्र फेटा देखील बांधल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी हा योग जुळून आलाय. या कार्यक्रमाला तीनही नेते एकाच व्यासपीठावर बघायला मिळाले. विशेष म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं. शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य घेणार, असं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
दरम्यान, धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा एकाचवेळी फेटा बांधत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एकीकडे धनंजय महाडिक फेटा बांधण्यासाठी बसले आहेत. त्यांच्या बाजूला हसन मुश्रीफ आहेत. तर तिसऱ्या बाजूला खुर्चीवर सतेज पाटील बसले आहेत. या तीनही बड्या नेत्यांचा फेटा बांधत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
असं दृश्य खूप वर्षांनी कोल्हापूरकरांना बघायला मिळालं. कोल्हापूरच्या विकासासाठी हेच चित्र बघायला मिळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना विचारला. त्यावर मश्रीफांनी आपली भूमिका मांडली. हे बघा, मी जेव्हा असेन त्यावेळी ही दोघं मंडळी असणार. त्यामुळे विकास करण्यासाठी दोघांचं सहकार्य आम्ही निश्चितच घेऊ, असं हसन मुश्रीफ म्हणाले.