चंद्रपूर : भारत, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटेन आदी देशांतील निवडक अभ्यासकांच्या उपस्थितीत जागतिक आंबेडकराईट परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील ऐतिहासिक निवासस्थानी पार पडली. जगभरातील अभ्यासकांसोबत चंद्रपूर येथील ॲड. दीपक यादवराव चटप यांनी प्रमुख वक्ता म्हणून या जागतिक परिषदेत छाप सोडली. परिषदेत ॲड. दीपक चटप यांच्या पाथ फाउंडेशन व पुण्यातील वोपा संस्थेने तयार केलेल्या ‘आपले संविधान, आपली ओळख’ या संविधानिक मोफत अभ्यासक्रमाची घोषणा व विमोचन जगभरातील अभ्यासकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ॲड.दीपक यादवराव चटप हे चंद्रपूर जिल्ह्यातील लखमापूर या छोट्याशा गावातील आहेत. लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत आहेत. त्यासाठी त्यांना ब्रिटीश सरकारची चेव्हेनिंग ही जागतिक प्रतिष्ठेची 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कामाची दखल जागतिक स्तरावर होत आहे. जागतिक आंबेडकराईट परिषदेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आधुनिक भारतातील शिक्षण पद्धती’ या विषयावर विचारमंथनासाठी चटप यांना पाचारण करण्यात आले.
भारतीय संविधान हेच देशासाठी सर्वसामान्यांना शिक्षणाचे कवाडे खुले करणारे क्रांतीकारी पाऊल आहे. विदेशात उच्चशिक्षण घेवून देशात सामाजिक परिवर्तन घडवण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी वंचित-बहुजन समाजाला दिली असल्याचे प्रतिपादन जागतिक परिषदेत अॅड दीपक चटप यांनी केले.
डॉ.बाबासाहेबांच्या लंडन येथील ऐतिहासिक घरी जगभरातील अभ्यासकांसमोर लंडन येथे पहिले भाषत देता आले, याचा मनस्वी आनंद आहे. डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन संविधानातील मूल्यांची तळागाळात रुजवणूक व्हावी, यासाठी विशेष अभ्यासक्रमाचे लोकार्पण केले आहे. संविधानिक मूल्यांची जाणीव मनात रूजवत स्वतःच्या हक्कांसाठी जागृत असणारे विद्यार्थी हीच देशाची संपत्ती ठरेल, असा विश्वास असल्याचं दीपक चटप यांनी सांगितलं.