अमरावती: कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय खेचून आणला आहे. या मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केले आहे. बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असूनही त्यांचा पराभव झाला आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या या निवडणुकीचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र, दुसरा निकाल भाजपच्या हातून जाण्याची शक्यता आहे. दुसरा आणि तिसरा निकाल महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार असल्याचं सध्या तरी चित्रं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी होताना दिसत आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. धीरज लिंगाडे हे दोन हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार रणजित पाटील हे पिछाडीवर आहेत.
नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले हे विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहेत. आडबोले यांना 13 हजार मते पडली आहेत. ते 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपच्या ना. गो. गाणार यांना अवघे 6 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे गाणार यांचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, आडबोले हे 13 हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आल्यानंतर आडबोले समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. आडबोले समर्थकांनी नाचत गात, गुलाल उधळत आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली आहे. आडबोले यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळेच आम्ही आनंद व्यक्त करतोय, असं आडबोले समर्थकांचं म्हणणं आहे.