ऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार; राऊत यांची घोषणा

| Updated on: Jul 29, 2021 | 7:30 PM

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे वारंवार नुकसान होत असते. (nitin raut)

ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करणार; राऊत यांची घोषणा
nitin raut
Follow us on

चिपळूण: राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे वारंवार नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा नितीन राऊत यांनी केली आहे. (maharashtra government will form disaster management department in energy department, says nitin raut)

नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे राऊत म्हणाले. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मीटर त्वरीत बदलून द्या

रत्नागिरी जिल्ह्यात 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली. या प्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, महावितरण रत्नागिरी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झालटे, महापारेषाणचे कराड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश कोलप व महापारेषाणच्या अधिक्षक अभियंता शिल्पा कुंभार हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिलेत.

कामगारांचं कौतुक

चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करत, डोंगर दऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले.

मदत साहित्याचे वाटप

या दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. आपल्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.

साडे सात लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1942 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पूरात 7 लाख 53 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्र न् दिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1617 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 14 हजार 737 रोहित्रे बंद पडली असताना 11 हजार 368 रोहित्रे  सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 404 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 56 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे. (maharashtra government will form disaster management department in energy department, says nitin raut)

 

संबंधित बातम्या:

‘अंतरिक्षयान प्रपलशन’ विषयात पीएचडी करणाऱ्या ‘त्या’ विद्यार्थिनीला धनंजय मुंडेंचा मदतीचा हात, परदेश शिष्यवृत्तीचा विशेष आधार!

गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा : रामदास आठवले

भावली धरणाचे पाणी शहापूरला देणार नाही, नरहरी झिरवळांचा पवित्रा

(maharashtra government will form disaster management department in energy department, says nitin raut)