कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. शहरातील काही भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर या भागात पाणी भरलं असून, हे पाणी आता हळूहळू दसरा चौकापर्यंत भरत आहे. तर यमगर्णीजवळ हायवेवर पाणी आल्याने पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा, कोयना आणि पंचगंगा या नद्यांनी पात्रं सोडली आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे
पुराचा फटका जास्त करून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला बसतो. यामध्ये 30 ते 40 गावे पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे शेतीचे आणि घरांचे नागरिकांचे मोठे नुकसान होते. त्याच अनुषंगाने प्रशासनाने आज शिरोळ तालुक्यामध्ये एक एनडीआरएफ टीम सज्ज करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या पूर्वी महापुरामध्ये सर्वात जास्त फटका शिरोळ भागाला बसला होता. यामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. तसेच घरांचे मोठे नुकसान झाले होते. असाच जर पाऊस जर राहिला तर तर महापुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे थोडा काहीसा दिलासा शिरोळ, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला राहिला आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसतेय. 40 फुटांची इशारा पातळी ओलांडल्यानंतर आता 45 फुटांची धोक्याची पातळी काही तासात ओलांडण्याची शक्यता आहे, मात्र पूर पाहण्यासाठी किंवा नदीचा प्रवाह पाहण्यासाठी सांगलीकर अनेक ठिकाणी गर्दी करतायत. सकाळी आयर्विन पुलावर काही हौशी सांगलीकर पोहण्यासाठी गर्दी करत होते. मात्र त्यांना सूचना देऊन हटवण्यात आलेले आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचं आणि सूचनांच उल्लंघन करणाऱ्या सांगलीकरांवर कठोर कायदेशीर कारवाई करू असं पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलंय.
शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामधील ढगफुटी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये रेकॉर्डब्रेक असा पाऊस झाला आहे. 574 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 95 टक्के भरल्याने धरणातून 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे.
कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती गंभीर आहे. पावसाने आता जरी थोडीफार विश्रांती घेतली असली तरीसुद्धा ज्या गावांना पुराचा धोका आहे तिथल्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावं. जनावरांसह स्थलांतरासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. सांगलीतल्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सुद्धा वाढताना दिसत आहे. जवळपास 45 फुटांपर्यंत पाणी आलेलं आहे. तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होऊन, प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली
कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांने उचलून 10 हजार क्युसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून कोयना नवजात येथे चोवीस तासात 731 मिमी उच्चांकी पाऊस झाला आहे. धरणात 84 हजार क्युसेक पाणी आवक सुरु असून, धरणात 82.53 tmc पाणीसाठा झाला आहे. पायधा वीजगृहातून 2100 क्यूसेक तर सहा दरवाजातून 10 हजार क्यूसेक असा 12100 क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. दिवसभरात धरणाचे दरवाजे आणखी उचलून धरणातून 50 हजार क्युसेक पर्यंत पाणी विसर्ग वाढवणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. सोडलेल्या पाण्याचा सांगलीसह नदीकाठावरील गावांना पुराचा धोका असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावातील काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वाई तालुक्यातील देवरुखवाडी येथे दरड कोसळून 20 घरांपैकी 7 ते 8 घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यामधून रात्रभर रेस्क्यूद्वारे 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून अद्याप 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. गोठ्यात बांधलेली 30 ते 40 जनावरे यामध्ये दगावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री अतिवृष्टीमुळे रेस्क्यू मोहीम थांबवण्यात आली असून आज सकाळपासून ढिगारा हटविण्याचे काम सुरू ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांना प्रशासनाने तातडीने मदत करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
संबंधित बातम्या
Kolhapur Panchganga river : ड्रोनच्या माध्यमातून पाहा पंचगंगा नदीचं रौद्ररुप