लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी आणा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कुणी केली मागणी?

| Updated on: Dec 22, 2022 | 6:47 AM

गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक शाळेच्या छतावर आणि झाडांवरही चढले होते.

लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी आणा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कुणी केली मागणी?
लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर कायमस्वरुपी बंदी आणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली: प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमात नृत्य कमी अश्लीलता अधिक असल्याने तिच्या कार्यक्रमांवर महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी. तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे ही मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गौतमी पाटील महाराष्ट्रातील लावणी परंपरेला व संस्कृतीला छेद देत सार्वजनिक ठिकामी अश्लील नृत्य सादर करत असते. तिचे अश्लील हावभवाचे व्हिडीओ अॅपद्वारे घराघरात पोहोचतात. घरामध्ये माता, भगिणी व लहान मुले-मुली असतात. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतमी पाटील यांचे अश्लील नृत्य रोखण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांवरच बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील बेडग येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक शाळेच्या छतावर आणि झाडांवरही चढले होते. तिचे अश्लील हावभाव पाहून धिंगाणा घालत होते.

त्यावेळी दत्तात्रय ओमासे या तरुणाचा मृतदेह कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळून आला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली, असं या पत्रात नमूद करणअयात आलं आहे.

ओमासे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

गौतमी पाटील सार्वजनिक ठिकाणी नृत्याच्या नावाखाली अश्लील वर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असा दावाही या निवेदनातून करण्यात आला आहे.

चार दिवसापूर्वी बीडमध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण होवून कार्यक्रमादरम्यान दगडफेकसुद्धा झाली होती. त्यामुळे अश्लील नृत्य सादर करणाऱ्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.