रत्नागिरी : मुंबई-गोवा हायवेवर (Mumbai Goa Highway) शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात तीन वाहनं एकमेकांवर आदळली. या भीषण अपघाताची (Major Accident) तीव्रता किती प्रचंड होती, याची कल्पना फोटोवरुन करता येऊ शकेल. या अपघातात एक ट्रक (Truck) पुलाचा चक्क कठडा तोडून बाहेर लटकला होता. या अपघातामुळे शनिवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बावनदी पुलावर हा विचित्र अपघात झाला होता. मात्र सुदैवानं या भीषण अपघातात कुणाचाही मृत्यू झाला नाही. अर्टिगा कार (Maruti Suzuki Ertiga Car) आणि दोन ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला.
संगमेश्वर (Sangmeshwar Police) पोलिसांनी या अपघातप्रकरणी तपास करुन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
शनिवारी सकाळी मारुती जानी पाटील हे आपल्या टाटा ट्रकनं मुंबईहून भरधाव वेगानं निघाले होते. तर दोन महिंद्रा ब्लाझो ट्रक हे निवळी ते सातारा असे निघाले होते. ब्लाझो ट्रकच्या मागून एक अर्टिगा कारही येत होती.
ही सगळी वाहनं बावनदी पुलाजवळ वळणावर आही आणि टाटा ट्रकच्या चालकाचा गाडीवर ताबा सुटला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरील ताबा सुटून या टाटा ट्रकनं महिंद्रा ब्लाझो ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत मारुती सुझुकीच्या अर्टिगा कारलाही ब्लाझो ट्रकचा फटका बसला.
टाटा ट्रकने दिलेली धडक इतकी प्रचंड होती, ज्या ब्लाझो ट्रकचा त्यांनी धडक दिली, त्याच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या महिंद्रा ब्लाझो ट्रक मागे जाऊन तिरका फिरला. तिरका फिरत या ट्रकनं पुलाचा कठडा तोडला आणि हा ट्रक पुलाच्या बाहेरच्या बाजूस लटकला.
या भीषण अपघातामुळे शनिवारी या मार्गावरची वाहतूक तब्बल पाच तास ठप्प झाली होती. या अपघातात अर्टिगामधील एक प्रवासी जखमी झाला. सुदैवानं या अपघातमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. या अपघातप्रकरणी पोलिसांनी भरधाव वेगान गाडी चालवून चार वाहनांचं नुकसान केल्याप्रकरणी टाटा ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.