सांगली | 17 नोव्हेंबर 2023 : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज जालन्याच्या अंबड येथे आयोजित ओबीसींच्या एल्गार सभेत मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. ‘भुजबळ स्व कष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही’, असा घणाघात छगन भुजबळांनी त्यांच्या भाषणात केला. भुजबळांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “ते खूप शिकले, पण लोकांचं खाल्ल्यामुळे जेलमध्ये जावून आले”, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिलं आहे. “आम्ही आता मराठा समाजाने एक गोष्ट ठरवलीय, त्यांना टीका करण्याशिवाय काहीच राहिलेलं नाही हे माहिती आहे. मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात आलाय हे त्यांना कळून चुकलंय. त्यामुळे त्यांनी कितीही टीका केली तरी आम्ही आमचं ध्येय, आमचा फोकस ढळू देणार नाहीत”, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
“आता ते आम्ही चिडावं, शांतता राहू नये म्हणून त्यांचे सगळ्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काहीपण बोलायचं आणि या राज्यात शांतता राहू द्यायची नाही हे त्यांचं म्हणणं आहे. त्यांना काय माहिती, मी किती शिकलोय आणि काय झालोय. ते खूप शिकले तरीही लोकांच्या खाल्यामुळे मध्ये जावून आले. त्यामुळे कोण कुणाचं खातंय, यावर तरी किमान त्यांनी बोलू नये. त्यांना किमान राज्यात शांतता राहील असं बोलावं. या राज्याच दंगली घडतील असं त्यांनी बोलू नये”, असं आवाहन मनोज जरांगेंनी भुजबळांना केलं.
“या राज्यात मराठा समाज ओबीसी आणि मराठा असा वाद अजिबात होऊ देणार नाही. कारण तेही आमचे बांधव आहेत. या नेत्यांनी त्यांच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरी ही मराठ्यांची एकजूट आहे. ती एकजूट फुटत नाही आणि मराठा-ओबीसी वाद होणार नाही. तुम्ही कितीही एकत्र आले, कसलीही टीका केली, आम्हीदेखील टीकेला उत्तर द्यायला कच्चे नाहीत. पण आता आम्हाला तुम्हाला महत्त्वच द्यायचं नाही. तुम्हाला किती महत्त्व द्यायचं हे आमच्या लक्षात आलं आहे. तुम्ही किती खालच्या पातळीचे आहेत, हे आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही आमचा दर्जा खाली घसरु देणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“आम्ही आमची अशीच एकजूट ठेवणार. आम्ही या राज्यातलं वातावरण खराब होऊ देणार नाहीत. सरकरनेच यांच्याकडे जास्तीचं लक्ष केंद्रीत करुन राज्यातील कायदा-सुव्यवस्था हे बिघडवतील, हे ह्यांना थांबवावं. आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहोत. तुम्ही कितीही एकत्र आलात तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आम्हीसुद्धा 50 टक्के आहोत हे लक्षात ठेवा”, असा इशारा जरांगेंनी दिला.
“छगन भुजबळ कुठले आहे ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ते वयाने खूप मोठे आहेत. आम्हाला काढायला लाऊ नका. आम्ही तुमच्याबद्दलचा बायोडेटा गोळा केलेला आहे. तिथे आम्ही बीड जिल्ह्यातील खूप लोकं आलेला आहे. तिथे सारा आणि जावायाचा प्रश्न नाही. बीड जिल्ह्यातला खूप मोठा समाज गोदा पट्ट्यात आलेला आहे. एकतर त्यांना माहीतच नाही, कुणीतरी माकडानं सांगितलं असेल, कारण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हेच हळूहळू सांगत असतील. पण बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे अनेक जण गोदा पट्टीत आलेले आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“उगाच सासरा-जावायाचा प्रश्न काढायचा नाही. तुम्ही कुठले आहेत, तुमचाही बायोडेटा आमच्याकडे आहे. तुमच्या शेपटावर नाही, तुम्हीच आमच्या पायावर पाय देऊ नका. नाहीतर तुमचीसुद्धा आम्ही खैर करणार नाहीत. भानाने बोला. मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्याने काय होतं ते तुम्हाला कळेल. पण धमक्या देऊन राज्यातील शांतता बिघडवू नका. सरकारलाही सांगा यांना शांतता बिघडवायची आहे. यांच्यावर लक्ष ठेवा. आम्हाला शांततेत आरक्षण मिळवायचं आहे. ह्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून त्यांचा तीडपापड झालाय”, अशी टीका मनोज जरांगेंनी केली.