नांदेड : सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नांदेड शहरासह जिल्ह्याला समृद्ध करणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ देशाचे माजी गृहमंत्री, जलक्रांतीचे जनक आणि आधुनिक भगीरथ डॉ. शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून स्मारक उभारणीसाठी 13.26 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व आराखड्यास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली आहे.
नियमाक मंडळाच्या पुढील बैठकीत हा ठराव कायम करण्याची वाट न पाहता कार्यकारी संचालकांनी कार्यवाही करण्यास नियामक मंडळाची सर्वानुमते मान्यता देण्यात येत आहे, असे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता म. र. अवलगावकर यांनी प्रशासकीय मान्यता आदेशात म्हटले आहे.
14 जुलै 2019 ते 14 जुलै 2020 दरम्यान डॉ शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष हे विविध कायर्क्रमाच्या माध्यमातून साजरे करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकल्प, धरणे उभारणीतील योगदान अत्यंत मोठे आणि मोलाचे राहिलेले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज जायकवाडी, विष्णुपुरी या प्रकल्पामुळे मराठवाड्याची तहान भागविली जात आहे.
त्यांच्या या कार्याची पुढील पिढीला माहिती व्हावी, त्यांचे कार्य चिंरतन स्वरुपात एखाद्या स्मारकाच्या रुपात कायम ठेवावे या हेतूने शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयाजवळ त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या दि. 10 जुलै 2020 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत स्मारक उभारणीविषयी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने वास्तूविशारदाकडून स्मारकाचा आराखडा व अंदाजपत्रक मागविले होते. त्यानंतर राज्य शासनाने नऊ मार्च 2021 राेजी या स्मारकासाठी महामंडळाच्या स्वनिधीतून खर्च करणे प्रस्तावित असल्याने नियामक मंडळाने प्रशासकीय मान्यता देणे उचित होईल, असे निर्देश दिले होते.
त्यानुसार फोटीर्ज इन्फ्रास्ट्रक्चर अॅडव्हायजरी सर्विस या वास्तूविशारदाकडून शंकरराव चव्हाण स्मारकाचे आराखडा व अंदाजपत्रक तयार करुन घेण्यात आले होते. त्याला 2 जून 2021 रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलाशयाजवळ उभारण्यात येणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मारकामुळे नांदेड शहराच्या वैभवात आणखी भर पडणार असून शहरात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटक यांसाठीही हे आकर्षण ठरणार आहे.
(Memorial of Shankarrao Chavan near Vishnupuri reservoir in nanded)
हे ही वाचा :