मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार 288 घरांसाठी सोडत (Mhada lottery 2021) आज जाहीर होणार आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीचा आरंभ होणार असून या वेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित राहणार आहेत.
ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. – http://mhada.ucast.in या संके तस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार 100 जणांना सभागृहात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.
सकाळी 10 वाजल्यापासून सोडतीला सुरुवात होणार असून एकेका संकेत क्रमांकानुसार ऑनलाइन सोडत काढली जाईल. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोकण विभागीय मंडळ तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जवळपास 9 हजार घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. कोविड 19 संकटामुळे म्हाडाची ही लॉटरी लांबणीवर पडली होती. यंदाच्या वर्षी 6500 घरं ही प्रधानमंत्री आवास योजना, 2000 घरं ही मंडळाची तर 500 घरं इतर काही प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोरोना या प्रमुख कारणांसह उर्वरित कारणांमुळे दोन्ही मंडळांची घराची लॉटरी निघत नव्हती. त्यातल्या त्यात कोकण मंडळाकडून घराच्या लॉटरीची आशा होती. मात्र, अनेक दिवस याबाबत हालचाली होत नव्हत्या. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे चित्र होते. मात्र, आता म्हाडाने सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
कोकण मंडळाच्या लॉटरीनुसार, वडवली येथे 20, कासारवडवली 350 घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून, या घरांची किंमत 16 लाखांच्या जवळपास राहणार आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे असणार असून, या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट आहे. या घराची किंमत 38 ते 40 लाखांच्या आसपास असेल. विरार येथे 1 हजार 300 घरे उपलब्ध असतील. यात एक हजार घरे अल्प आणि बाकीची घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील.
संबंधित बातम्या
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातून म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार