अमरावती: अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांच्या पुतळ्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा (ravi rana) समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin ashtikar) यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे. आज दुपारी रवी राणा यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारून त्यांच्या अंगावर थेट शाई फेकली. काही कळायच्या आत हा प्रकार झाल्याने आयुक्त आष्टीकरही काही काळ गोंधळून गेले. मात्र, पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून या महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. मात्र, या प्रकारामुळे पुतळा हटवण्याचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात आज दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. ओपन स्पेस असल्याने या ठिकाणी दोन महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आष्टीकर सतर्क झाले अन् ते जीवाच्या आकंताने पळाले.
आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना लहान लेकरासारखं कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या महिलांनी आयुक्तांच्या डोक्यावर संपूर्ण शाई ओतली. त्यामुळे आयुक्त शाईने पूर्णपणे माखून गेले. आयुक्तांचा पांढराशुभ्र ड्रेस निळानिळा झाला होता. त्यांचा चेहरा, मान आणि शरीरही शाईने भरून गेलं होतं.
यानंतर सुरक्षा रक्षकाने आयुक्त आष्टीकर यांना गाडीत बसवले. त्यानंतर आयुक्त आपल्या घरी गेले. मात्र, झाल्या प्रकारामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या महिला आमदार रवी राणा यांच्या समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.
रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी महापालिकेत केली होती. मात्र कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्याने तो पालिकेने काढला. त्यावरून राजकारण तापलं होतं.
संबंधित बातम्या:
Nashik Murder Mystery | डॉ. सुवर्णा वाजे जळीत कांड; पतीच्या 3 मित्रांची चौकशी, पण शेवटचा मोहरा बाकी!