दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सातारा: मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांचं दिलखुलास स्वागत केलं. अमित हा माझ्या खास मित्राचा मुलगा आहे. अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. तसेच अमित हँडसम असला तरी हम भी कुछ कम नही, अशी मनमुराद फटकेबाजीही केली. त्यामुळे एकच खसखस पिकली.
अमित ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी ते साताऱ्यात आले आहेत. यावेळी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. माझ्या खास मित्राचा मुलगा आला. माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, असं उदयनराजे म्हणाले.
केवळ अमितच नाही. बाकी इतर तरुणांनीही राजकारणात पुढे आलं पाहिजे. या तरुणांच्या हातून लोकांची सेवा झाली पाहिजे. ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब असतील. राज ठाकरे असतील. या सर्वांचा नावलौकिक त्यांनी केला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांची फॅन फॉलोईंग जोरात आहे, असं ते त्यांनी सांगितलं.
मला सांगितलं अमित येणार आहे. मी म्हटलं येऊ दे. म्हटलं क्लपबिलप तरी करतो. पण राहिलं. कारण अमित तरुण आहे. त्यांच्याशी मॅच तरी झालो पाहिजे. तुम्ही दिसाल गोंडस पण आम्ही आपलं… मी छानच दिसतो… हम भी कुछ कम नही… असं उदयनराजे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. यावेळी त्यांनी अमित यांच्या हातून मोठं कार्य घडावं अशी आशा व्यक्त केली. तसेच अमित यांना उदंड आयुष्य मिळावं अशी कामनाही केली.
अमित ठाकरे यांना मी परफ्यूम दिलं आहे. बल्गारिचं आहे. मॅन असं या परफ्यूमचं नाव आहे. अमितला म्हटलं आता तू लहान मुलगा नाहीस. तू माणूस आहे. तू आता सर्वांची काळजी घेतली पाहिजे. यू नो लाँगर स्मॉल बॉय, यू आर मॅन.. असं उदयनराजे यांनी म्हणताच पुन्हा हशा पिकला.
यावेळी अमित ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असे होऊ शकत नाही. त्यामुळे राजे आहेत का विचारलं आणि भेटलो. ही राजकीय भेट नव्हती. ही सदिच्छा भेट होती. आमच्या कुटुंबाचे राजेंशी खूप जुने संबंध आहेत म्हणून भेटीला आलो.
राजे म्हणाले “माझा मुलगा आल्यासारखे वाटले” त्यामुळे मला खूप बरे वाटले, असं अमित ठाकरे म्हणाले. राजेंचा एकदम दिलखुलास आहेत, या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले, हो अॅब्स्युलिटली.