गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 500 गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरू झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील व्यसनाधीनतेच्या प्रमाणातही वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे, असं म्हटलं. मागील 27 वर्षांपासून दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये महिलांनी प्रभावीरित्या दारूबंदी लागू केलीय (More than 500 villages protest against removal of Alcohol ban in Chandrapur send letter to CM Thackeray).
सरकारने 1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. मात्र, 27 मे रोजी मंत्रिमंडळाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सुरु करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारू पुन्हा सुरु झाल्यास दारूबंदी असलेल्या लगतच्या गडचिरोली जिल्ह्याला निश्चितच धोका होणार आहे. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीत वाढ होईल. दारूची तस्करी वाढणार. चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही, यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करून याची जबाबदरी घेणे आवश्यक आहे, असे मत गडचिरोलीतील गावांनी व्यक्त केलं आहे.
दारूमुळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतात. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरी, गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मूळ कारण दारू आहे. मग अशा दारूसारख्या पदार्थाला सरकारने प्रोत्साहन का द्यावे? असा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील 500 गावांनी सरकारला केलाय. या गावांनी चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यासंदर्भातील निर्णयाचा निषेध केला आहे. याबाबत आतापर्यंत जिल्ह्यातील 500 गावांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यात सातत्याने वाढ होत आहे.
More than 500 villages protest against removal of Alcohol ban in Chandrapur send letter to CM Thackeray