नांदेड | 23 सप्टेंबर 2023 : आपण मेहनत करणं सोडायचं नाही. आपल्याकडून प्रामाणिकपणे होईल तितकी मेहनत करायची. आपण केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. ती मेहनत आपल्याला काहीना काही परतफेड देतेच. त्यामुळे परिस्थितीशी लढत राहीलं पाहिजे. विशेष म्हणजे ही झुंज देत असताना संयम सोडायचा नाही. आपण संघर्ष करत असताना अनेक प्रसंग असे घडतात की, आपण माघार घ्यायचा विचार करतो. पण अशा कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विचार न करता, न डगमगता आपण परिस्थितीशी दोन हात केले तर शेवटी आपल्यासमोर नियतीदेखील गुडघे टेकते.
आपण केलेल्या संघर्षामुळे यश आपल्या पायाशी लोटांगण घालतं, आणि संपूर्ण जग आपल्या यशाचं कौतुक करतं. नांदेडमध्ये एका तरुणाने हीच गोष्ट साध्य करुन दाखवली आहे. या तरुणाचं सागर शिंदे असं नाव आहे. सागर एक-दोनदा नाही तर तब्बल 23 वेळा अपयशी झाला. तो 23 वेळा एमपीएससीच्या परीक्षेत अपयशी झाला. पण त्याने हार मानली नाही. तो जिद्दीने अभ्यास करत राहिला आणि परीक्षा देत राहीला. अखेर त्याच्या मेहनतीचं चीज झालंय.
देव देतो तर छप्पड फाडून देतो, असं म्हणतात. अर्थात हा श्रद्धेचा मुद्दा आहे. पण गेली सहा वर्षे 23 वेळा एमएससी परीक्षेत अपयशी झालेला सागर शिंदे यावेळी तब्बल दोन परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालाय. त्यामुळे त्याची नांदेड जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे. सागर मंत्रालयातील लिपीक आणि कर सहाय्यक अधिकारी या दोन्ही नोकरीसाठी पात्र ठरलाय. सागरने कर सहाय्यक अधिकारी पदाची नोकरीची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतलाय.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माटाळा हे सागर शिंदे याचं गाव आहे. सागरची घरची परिस्थिती बिकट आहे. त्याने सात वर्षे संघर्षमय स्थितीत अभ्यास केला, आणि 24 व्या प्रयत्नात त्याने मंत्रालयातील लिपिक आणि कर सहहायक अधिकारी अशा दोन्ही नोकरीसाठी तो पात्र ठरलाय. दोन चार वेळा अपयश आल्यानंतर टोकाचे निर्णय घेणाऱ्या युवकांनी सागरच्या यशापासून धडा घ्यावा, अशीच ही कहाणी आहे. सागरच्या या यशानंतर गावकऱ्यांनी त्याचे मोठ्या थाटात स्वागत करत त्याच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केलाय.
“यश आणि अपयश हे येतंच राहतं. अपयश आलं तर न डगमगता आपण पुढे चालत जायला पाहिजे. यश नक्की मिळतं. माझ्यासारखे किती तरी मुलं आहेत, ज्यांना अनेकवेळा अपयश मिळालं आहे. कुणी 50 वेळा अपयशी झाल्यानंतर अधिकारी बनलंय, तर कुणी 25 वेळेस अपयश आल्यानंतरही न खचून जाता मेहनत केली आणि यश ओढवून आणलं. तसंच माझंही आहे”, असं सागरने सांगितलं.
“घरची परिस्थिती सांगायची झाली तर अडीच एकर शेती आहे. या अडीच एकर शेतीत आई-वडिलांनी उदरनिर्वाह करुन मला पैसे पाठवले. त्यामुळेच हे यश प्राप्त झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया सागर शिंदे यांनी दिली. “मी 2016 पासून नांदेडला तयारी करत आहे. तेव्हापासून एमपीएससीची प्री, मेन्स परीक्षा देत-देत 2023 उजाडलं. पण 2022च्या परीक्षेत मला यश आलं”, असं म्हणत सागरने आनंद व्यक्त केला.
“माझी पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण माटाळा गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर पाचवी ते दहावी वळशी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे झालं. माझी अकरावी-बारावीचं शिक्षण कोपाडी येथील शिवाजी विद्यालय संस्था येथे झालं. त्यानंतर यशवंत महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतलं”, असं सागर शिंदेने सांगितलं.