सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आमनेसामने आले. राणेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचं सांगितलं. उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला, असं नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे आज मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्री उपस्थित होते. तर, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खासदार विनायक राऊत यांनी केलं. यावेळी नारायण राणे बोलत होते.
सिंधुदुर्गाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार… अशी राणेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंचावरील आदित्य ठाकरेंसह सर्वच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि रिपाइंच्या नेत्यांची नावे घेतली. माझ्या आयुष्यातील हा चांगला क्षण आहे. अशा ठिकाणी राजकारण करू नये असं वाटत होतं. जावं, शुभेच्छा द्याव्या आणि सिंधुदुर्गातून विमान उडताना डोळेभरून पाहावं असं वाटलं. त्यासाठी आलो. मंचावर आल्यावर मुख्यमंत्री भेटले. ते माझ्या कानावर काही तरी बोलले. मी एक शब्द ऐकला. असो, असं राणे म्हणाले.
पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांनी यावं. पाच सहा लाख खर्च करावेत, त्यामुळे सिंधुदुर्गाच्या वासियांना रोजगार मिळावा. या हेतूने हे विमानतळ व्हावं हा हेतू होता. 90 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती. इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.
तुम्ही आलात हे बरं वाटलं. आनंद वाटलं. सन्मानिय आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी अभ्यास करावा. त्यांनी टाटाचा रिपोर्ट वाचावा. आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्रि आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.
स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. प्रोटोकॉल जरुर पाळा. तुम्हाला सर्व माहिती मिळते, ब्रीफ होतेय. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांना थारा नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं ते म्हणाले.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021 https://t.co/IYnP9ZfALa #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
संबंधित बातम्या:
नवाब मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?; प्रविण दरेकर यांचा सवाल
(narayan rane address at chipi airport inauguration function in Sindhudurg, Maharashtra)