सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल देसाई ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. जेव्हा ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, तेव्हा देसाईच नव्हे तर खुद्द केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांचीही घालमेल झाली. खुद्द राणेंनीच त्यांची घालमेल कशी झाली हे सांगितलं. निकाल लागत असताना तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं होतं. आंघोळ करता करता मी थांबलो होतो, असं सांगत नारायण राणे यांनी मनमुराद हसून तणावाला वाट मोकळी करून दिली.
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे मुंबईत होते. जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झाल्याची बातमी येताच राणे सिंधुदुर्गाच्या दिशेने गेले. त्यांनी सिंधुदुर्गात येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यावेळी ईश्वर चिठ्ठीने निवडून आलेले विठ्ठल देसाईही बाजूलाच बसलेले होते. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी लढत झाली होती. यावेळी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीने निकाल देण्यात आला. त्यात विठ्ठल देसाई विजयी झाले होते.
तुम्ही (विठ्ठल देसाई) जिंकला खरं वाटतंय… नशीब आहे हां… नशीब आहे… मोठ्ठं नशीब आहे… चिठ्ठीवर येणं म्हणजे मोठ्ठं नशीब. तुम्ही आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं. मी आंघोळ करता करता थांबलो… म्हटलं अरे काय ते…, असं राणे म्हणाले. तेव्हा एकच खसखस पिकली. स्वत: राणेंनीही हा किस्सा सांगताना मनमुराद हसून दाद दिली.
यावेळी त्यांनी राजन तेलींच्या पराभवावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही, असा टोला त्यांनी लगावला.
ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते. नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चाललं. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. कुणाविरोधात? अतिरेक्यांविरोधात? अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात याला अक्कल म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला.
संबंधित बातम्या:
Mahadev jankar : काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, महादेव जानकरांचा आरोप