रत्नागिरी: राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात अडिच वर्ष सत्ताही स्थापन केली. यापुढेही ही आघाडी कायम ठेवण्याचा निर्धारही या तिन्ही पक्षांनी केला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंतच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक अनोखीच महायुती जन्माला आली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला वगळून ही महायुती जन्माला आली आहे.
लांजा तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक होत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे. 17 जागांसाठी मतदान होत असून एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही एक छोटी निवडणूक असली तरी ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खरेदी विक्री संघावर आपला वरचष्मा राहावा म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपली गणितं मांडली असून त्यानुसार काम करत आहेत.
लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र अनोखी युती झालेली पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदे गट विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना होईल अशी अपेक्षा होती. भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्रं दिसेल असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, अनोख्या महायुतीमुळे केवळ लांज्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
लांज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा गट स्वबळावर लढणार आहे. ठाकरे गटाविरोधात सर्व पक्षीय पॅनल एकवटलं आहे. या पॅनलला सहकार पॅनल असं नाव देण्यात आलं आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ लांजा गावचे ग्रामदैवत श्री देव चव्हाटा तसेच देव केदारलिंग मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.
लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरोधात सर्वपक्षीयांचे सहकार पॅनल उभे ठाकले आहे. एकूण 17 जागांसाठीची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.