जळगाव | 12 ऑगस्ट 2023 : अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 17 महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. अवघ्या दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणास्तव मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर येत्या एक ते दोन दिवसात मलिक तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यामुळे मलिक अजितदादा गटात जाणार की शरद पवार गटात जाणार? मंत्रीपदी बसणार की राष्ट्रवादीचं काम करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलिक यांच्या आगामी भूमिकेबाबत सस्पेन्स असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे बडे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना एक मोठा दावा केला आहे. शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर उपकार आहेत. शरद पवार यांनी मलिक यांना राजकारणात अनेकदा संधी दिली आहे. मलिक यांचेही पक्षासाठी मोठं योगदान आहे. पण मलिक हे शरद पवार यांच्यासोबत राहतील यात शंका नाही. नवाब मलिक हे जर भाजपमध्ये केले तर ते स्वच्छ होऊन बाहेर येतील. त्यामुळे ते कुठे जाणार हे काळच ठरवेल. भाजप त्यांना पक्षात येण्यासाठी ऑफर देऊ शकतो, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरही टीका केली. भाजपा जवळ एक अशी मशीन आहे. माणूस घाणेरडा असला तरी या मशीनमध्ये स्वच्छ होतो. या तीन इंजिनच्या सरकारमध्ये आपसात अनेक भानगडी आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं जमत नव्हतं. त्यातच राष्ट्रवादी आल्यामुळे सत्तेची वाटणी झाली. तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरघोडी मोठ्या प्रमाणात आहे, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही नवाब मलिक यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला आहे. मलिक यांना 16 महिन्यानंतर मोकळा श्वास घेता येणार आहे. ट्रायल सुरू नसताना मलिक यांना 16 महिने आत ठेवण्यात आलं. हा कोणता कायदा आहे? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच एक इंजेक्शन मिळाल्यानंतर मलिक यांची सुटका करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मलिक यांच्या सुटकेचं स्वागत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, ही आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ते लवकरच दोषमुक्त होतील हा विश्वास आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.