सोलापूर : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नागरिकांशी संवाद साधत आहेत. शरद पवार यांनी सोलापुरातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून ते सोलापुरात आहेत. यावेळी त्यांनी एक मोठा निर्धार बोलून दाखवला आहे. आता पुनश्च हरिओम करायचं आहे. वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. हाच निर्धार मी मनाशी पक्का केला आहे, असं शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक अस्वस्थ होते. त्यांच्यासाठी मला माझा निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलावे लागले त्यात एक गैरसमज होता. मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ संघटनेचं काम सोडलं नव्हतं. लोकांशी संपर्क करायचा ठरवलं होतं. पण तो गैरसमज झाला. आज तो दूर झाला याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले.
कामाची सुरुवात तर करणारच होतो. माझी कामाची अनेक वर्षाची एक पद्धत आहे. कामाची सुरुवात करण्यासाठी मी दोन पैकी एका ठिकाणाची निवड करतो. एक तर सोलापूर किंवा कोल्हापूर. सोलापूरपासून दौऱ्यावर जावं हा विचार होता. त्यामुळे मी आलो. सामान्य कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं हे शहर आहे. त्यामुळे मी इथे आलो. मला याचं समाधान आहे, असं सांगतानाच या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटावं त्यांचा उत्साह वाढवावा. पुनश्च हरिओम करावं. वेगाने महाराष्ट्राचं चित्रं कसं बदलता येईल याची काळजी घेणं हे मी ठरवलंय, असं पवार म्हणाले.
बदल घडवून आणायचा असेल तर आम्हाला लक्ष घालावं लागेल. काम करावे लागेल. लोकांच्या सुखदु:खाशी समरस व्हावं लागेल. ते आम्ही करू. काम करावं लागेल. त्याशिवाय चित्र बदलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस हा साडे तीन जिल्ह्याचा पक्ष आहे. तरीही कर्नाटकात निवडणुका लढत आहे. हे पार्सल फेकून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील जनतेला केलं आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आज निपाणीला चाललो आहे. कोण पार्सल आहे आणि कोण किती वर्षाचा आहे हे सर्व तिथे बोलणार आहे. इथे नाही बोलणार, असं पवार म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मुंबईत येत आहेत. मला मेसेज मिळाला आहे. 18 तारखेला ते येणार आहेत. भेट होण्याची शक्यता आहे. बघुया. काही झालं तरी आम्हा सर्वांचा दृष्टीकोण एकच आहे, या देशाला पर्याय द्यायचा. नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी कोणी असो, जे कोणी पर्याय देतील त्यांना बळ देण्याचं काम मी करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दैनिक सामनाचा अग्रलेख मी वाचला नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देऊ. आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊनच मी भाष्य करेल. नाही तर गैरसमज निर्माण होतील. पण शिवसेनेची भूमिका आघाडीच्या ऐक्याला पोषक अशीच असेल, असं सांगतानाच महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित आहे. काही काळजी करू नका, असं पवार म्हणाले. शरद पवार यांनी वारस निर्माण केला नाही या सामनातील विधानावर हे त्यांचं मत आहे, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.