चंद्रपूर : वन विकास महामंडळाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा आगारात मोठ्या प्रमाणात सागवान येते. हा सागवान गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातून येते. विभागातून सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट (Central Vista Project) अंतर्गत दिल्ली येथे नव्या संसद भवनाचे बांधकाम होत आहे. या नव्या संसद भवन बांधकामाकरिता सुमारे 300 घनमीटर सागवान लाकूड बल्लारशा आगारातून खरेदी करण्यात आले आहे. दोन दिवसात 22 कोटींचे सागवान विक्री करण्यात आले आहे. 2022-2023 मध्ये 165 कोटींच्या सागवानाची या आगारातून विक्री (Sales) झाली आहे. महाराष्ट्रात वन विकास महामंडळ (Forest Development Corporation) हे शासनाचे अंगीकृत व्यवसाय केंद्र आहे. महामंडळात दर्जेदार सागवानाची निर्मिती करून त्याची विक्री केली जाते.
वनविकास महामंडळातील दर्जेदार सागवानाचा भारताच्या संसद भवनासाठी वापर होत असल्याने ही बाब महामंडळासाठी गौरवास्पद आहे. 7 जून 2022 रोजी बल्लारशा विक्री आगारातून जाहीर लिलावात फायनल फिलिंग दर्जेदार सागाची विक्रमी विक्री करण्यात आली. यातून महामंडळाला दोन दिवसात 22 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. येथून 2022-2023 या वर्षात 165 कोटी रुपयांच्या वनउपजाची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. ऑफलाइन लिलावात जवळपास 100 कोटी रुपयांचा महसूल महामंडळाला मिळाला आहे. अशी माहिती बल्लारपूर वनविकास महामंडळाचे सहायक वनसंरक्षक गणेश मोटकर यांनी सांगितलं.
चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा पॅटर्न अतिशय चांगला आहे. हा लाकूड टिकाऊ आहे. यासंदर्भात टेस्टिंग सर्टीफिकेट करण्यात आलं. वेगवेगळ्या पातळ्यांवर या सागवान लाकडाच्या चाचण्या झाल्या. हा उत्तम लाकूड असल्याचं तज्ज्ञांना लक्षात आलं. टिकाऊता, उपयुक्तता आणि अतिशय आकर्षक असा हा सागवान लाकूड आहे. यामुळं या लाकडाला पसंती देण्यात आली. इथं असलेलं लाकूड हे मुख्यत्व चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून आलेलं आहे. संसद भवनाच्या बांधकामाची शोभा वाढविण्यासाठी उत्कृष्ट लाकडाची आवश्यकता होती. त्यासाठी देशभरातील लाकडाची चाचपणी करण्यात आली. यात चंद्रपूर, गडचिरोलीचा लाकूड उत्कृष्ट असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळं या लाकडाची निवड करण्यात आली आहे.