कोल्हापूर | 22 ऑगस्ट 2023 : राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे. राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. कल्याणमध्ये नुकतंच एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीसही सतर्क झाले आहेत.
महिला अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील तर पोलिसांनी आणि न्यायपालिकेने आरोपींवर अतिशय कठोरपणे कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जातेय. कारण समजामध्ये घटनादेखील तशा घडत आहेत. काही दिवसांपूर्वी जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेच पाच दिवसांनी पाचोरा तालुक्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली. या घटनांमुळे आता पोलीसही महिला आणि मुलीच्या सुरक्षेसाठी आक्रमक झाले आहेत.
पोलिसांचं निर्भया पथक आता कामाला लागलं आहे. कोल्हापुरात याचा प्रत्यय बघायला मिळालाय. कोल्हापुरातील महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथकाने धडक कारवाई केली आहे. कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना निर्भया पथकाकडून चांगलाच लाठ्यांचा प्रसाद देण्यात आलाय.
विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली, निर्भया पथकाकडून कोल्हापुरात ही कारवाई करण्यात आलीय. #Kolhapur #nirbhaya pic.twitter.com/5FNwnOeVhd
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 22, 2023
विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली. तर इतर तरुणांनाजदेखील काठीचा प्रसाद मिळालाय. यावेळी अचानक झालेल्या कारवाईमुळे तरुणांची चांगलीच धावपळ उडाली. कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालयांच्या आवारात वाढलेल्या अवैध कृत्याच्या पार्श्वभूमीवर निर्भया पथकाकडून ही धडक कारवाई करण्यात आली.