पूरग्रस्त परिसरातील वीज यंत्रणेला 34 कोटी 68 लाख रुपयांचं नुकसान, नितीन राऊत यांची माहिती

| Updated on: Jul 31, 2021 | 3:34 AM

पूरग्रस्त परिसरामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत उपकेंद्र, वीज वाहिन्या व रोहित्र यांचे प्राथमिक अंदाजानुसार 34 कोटी 68 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

पूरग्रस्त परिसरातील वीज यंत्रणेला 34 कोटी 68 लाख रुपयांचं नुकसान, नितीन राऊत यांची माहिती
Nitin Raut
Follow us on

सांगली : पूरग्रस्त परिसरामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत उपकेंद्र, वीज वाहिन्या व रोहित्र यांचे प्राथमिक अंदाजानुसार 34 कोटी 68 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ते पुरग्रस्त भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज (30 जुलै) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. महापुरामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील मिरज, शिराळा, वाळवा, पलूस या तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. स्थानिक जनतेच्या घराघरांमध्ये पाणी शिरले. पूरग्रस्त परिसरामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचं मोठं नुकसान झालं.

“पूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेच्या विकासकामांचा आराखडा तयार करा”

नितीन राऊत यांनी पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या महावितरणच्या दुधगाव, कवठेपिरान, शेरीनाला येथील 33/11 केव्ही उपकेंद्राची पाहणी केली. पुरग्रस्त भागातील पूर पाण्याची पातळी लक्षात घेऊन विद्युत यंत्रणेची उंची वाढविण्यासाठी आराखडा तयार करा, शक्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करा, अशा सूचना डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या सांगली जिल्हा दौऱ्यावर त्यांच्या सोबत सहकार ,कृषी, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

“सांगली जिल्ह्यातील पाणी शिरुन बाधित झालेली 17 उपकेंद्रं पूर्ववत”

नितीन राऊत म्हणाले, “सांगली शहराचा वीजपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील 17 उपकेंद्रात पाणी शिरल्याने बाधित झालेली सर्व उपकेंद्रे पूर्ववत करण्यात आली आहेत. पूर पूर्व नियोजन केले असल्याने उपकेंद्रे पाण्यात जाऊनही वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात महवितरणला यश आले. पर्यायी विद्युत वाहिनीवरून वीज पुरवठा घेऊन बहुतांश भाग सुरू करण्यात आला. शहरातील कोविड केंद्रे व ऑक्सिजन प्रकल्पाचा वीजपुरवठा बाधित होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. लोकांची पाण्याची गैरसोय दूर होण्यासाठी पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य दिले गेले.”

“वीजपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू”

“29 जुलैपर्यंत एकूण बाधित घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीत 67628 ग्राहकांपैकी 65734 वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्य कार्यालय व प्रादेशिक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्तरावर दुरुस्ती कार्य सुरू आहे. लवकरच सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. यापूर्वी देखील 2019 मध्ये महापुराचा सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यावेळी 12 ते 15 दिवसात दुरूस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता,” असंही राऊत यांनी नमूद केलं.

“5 दिवसात पूरबाधितांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणतला यश”

या पूर्वानुभवाचा व प्रभावी नियोजनाचा फायदा घेऊन यावेळी 5 दिवसात पूरबाधितांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणतला यश आले आहे. या कामगिरीबद्दल महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ऊर्जामंत्री राऊत यांनी विशेष कौतुक करून पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कोल्हापूर मुक्कामी राहून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनाचा विशेष उल्लेख केला.

राज्यातील पुरस्थितीचा विचार करता, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1942 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पूरात 7 लाख 87 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1709 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 14 हजार 737 रोहित्रे बंद पडली असताना 12 हजार 46 रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 411 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 61 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे.

सांगली दौऱ्यावर असताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर पलूस तालुक्यातील बुर्ली, आमनापूर, अंकलखोप येथे भेटी देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. त्यानंतर वाळवा तालुक्यातील पुराचे पाणी शिरलेल्या दुधगाव व कवठे पिरान या दोन उपकेंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

यावेळी आ. शमोहनराव कदम, आ. अरुण लाड, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, सांगलीचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, महापारेषणच्या अधिक्षक अभियंता शिल्पा कुंभार, माजी संचालक महापारेषण अभिजित भोसले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कार्यकारी अभियंता विनायक इदाते, कार्यकारी अभियंता चाचणी पराग बापट, उपविभागीय अभियंता गणेश मरकड, तहसीलदार निवास ढोणे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, माजी जि. प. सदस्य हेमंत पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, बुर्ली गावचे सरपंच राजकुमार चौगुले, आमनापूरचे सरपंच विश्वजित सूर्यवंशी, अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी, तसेच सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व जनमित्र यांची उपस्थिती होती.

बुर्ली ग्रामस्थांच्यावतीने पूर काळात सुरळीत वीजपुरवठा दिल्याबद्दल महावितरण कर्मचाऱ्यांचा ऊर्जामंत्री राऊत यांच्या हस्ते सत्कार केला. बुर्ली ग्रामस्थांनी या भागातील पुराने नुकसान झालेल्या महावितरणच्या वीज खांबाची उभारणी करावी तसेच या गावाच्या परिसरात नव्याने वसलेल्या वस्त्यांकरिता वीज पुरवठ्याची मागणी केली. याप्रसंगी ऊर्जामंत्री राऊत यांनी, हिंमतीने व जीव ओतून 24 तास वीजपुरवठा सुरू राहील याची खबरदारी घेतल्याबद्दल वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पूरग्रस्त बुर्ली ग्रामस्थांच्या मागण्याबाबत सकारात्मक असून सर्वतोपरी मदत करू असे आश्वस्त केले. सदर दौऱ्यात अंकलखोप येथे पुरग्रस्त भागातील सरपंचांची बैठक घेऊन चर्चा केली.

हेही वाचा :

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

पूरग्रस्त गावातील पाणीपुरवठा, शेती वीजबिल माफ करा, सांगलीकरांचं उर्जामंत्री नितीन राऊत यांना साकडं

ऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार; राऊत यांची घोषणा

व्हिडीओ पाहा :

Nitin Raut comment on flood damage to MSEB