रायगड : अलिबाग मुरुड रस्त्यावरील एक जुना पूल कोसळल्याची घटना घडलीय. काशीद येथील नाल्यावरील हा पूल कोसळल्यानं एक कार आणि मोटार सायकल अशी दोन वाहनं अडकली. अडकलेली दोन्ही वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. वाहनांमधील 6 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, यापैकी एका प्रवाशाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय. या दुर्घटनेनंतर मुरुडकडे जाणारी वाहने रोहा सुपेगाव मार्गे वळवण्यात आली. प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु होती. नदीत आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हा 50 वर्षांचा जीर्ण झालेला पूल वाहून गेला. अलिबाग-मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवर असलेला हा जुना पूल कोसळला.
यात एक चार चाकी वाहन व एक मोटारसायकलसह पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. यात एक मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. मृत व्यक्ती एकदरा येथील आहे. विजय चव्हाण असं या मृत व्यक्तीचं नाव आहे, अशी माहिती मुरूडचे नायब तहसिलदार रविंद्र सानप यांनी दिली.
Old bridge in Murud Alibaug Raigad collapse due to heavy rain