पालघर / 5 ऑगस्ट 2023 : खदानीजवळ क्रिकेट खेळणे एका मुलाच्या जीवावर बेतले आहे. पाण्यात बॉल पडला म्हणून काढायला गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा खदानीत पडून मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. विरार पूर्वेकडील जीवदानी डोंगराच्या बाजूला असलेल्या खदानीत ही घटना घडली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खदानीत बुडून मेल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र या खदानींवर कोणतीही कारवाई होत नाही. खदानीजवळ कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत.
गुरुवारी सायंकाळी मयत मुलगा खदानीजवळ मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. यावेळी त्यांचा बॉल पाण्यात पडला. तो बॉल काढण्यासाठी मुलगा खदानीजवळ गेला. बॉल काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी याबाबत आरडाओरडा केल्याने लोक धावत आले. यानंतर अग्नीशमन दलाला याची माहिती देण्यात आली. मात्र अग्नीशमन दलाला यश आले नाही. बराच वेळ शोध घेऊनही मृतदेह हाती लागत नव्हता.
अखेर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफने शोध मोहिम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. विरार पोलिसांनी आकस्किक मृत्यूची नोंद करण्यात आली. मुलाच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.