रायगड : “भाजप भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगराच्या बाबतीत कोणीही पक्षीय राजकारण न करता येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना पोस्को कंपनीकडून न्याय मिळाला पाहिजे. येथे कोणाचीही दादागिरी व गुंडगिरी चालू देणार नाही. कायदा व सुव्यवस्था सुरळित राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता दोषींवर तात्काळ कारवाई करा,” अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. माणगाव येथील पोस्को कंपनी व प्रशासनाच्या विरोधात बसलेल्या विळे भागाड एम.आस.डी.सी. प्रकल्पग्रस्त स्थानिक भुमिपुत्रांच्या उपोषणास विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी तेथील भुमिपुत्रांच्या समस्याही जाणून घेतल्या.
भूमिपूत्रांना न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दरेकर यांच्या उपस्थितीत येथील उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडले. विळे भागाड एम.आय.डी.सी परिसरात पोस्को कंपनी गैरवर्तुणक करणाऱ्यांवर, जमाव जमवून गाड्यांचे नुकसान करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाला लेखी स्वरुपात तक्रार देऊन अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तसेच तक्रारीची दखल न घेतल्यामुळे येथील भूमिपुत्रांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता.
पोलीस प्रशासनाला लेखी स्वरूपात तक्रार देऊनही माणगाव येथील विळे भागाड MIDC परिसरात पोस्को कंपनी समोर बेकायदेशीर गैरवर्तवणूक करणाऱ्यांवर, जमाव जमवून गाडयांचे नुकसान करणाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे उपोषणास बसलेल्या स्थानिक भुमीपुत्रांना भेटून pic.twitter.com/67XCc7CqJE
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 13, 2021
प्रविण दरेकर म्हणाले, “भाजप भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पास्को कंपनीमध्ये स्थानिक भूमिपूत्रांना नोकरी मिळाली पाहिजे. परंतु काही पुढाऱ्यांच्या दबावाखाली येथील पोलीस प्रशासन आंदोलनकर्त्यांना वेठीस धरत आहे. पास्कोच्या माध्यमातून जी गुडंगिरी सुरु आहे त्याविरोधात विरोधी पक्ष नेता या नात्याने आवाज उठवणार आहे. येथील भूमिपुत्रांच्या आपण सोबत आहोत. तसेच उद्योग, व्यवसाय व रोजगराच्या बाबतीत कोणीही राजकारण करु नये.”
“कोणीही पक्षीय राजकारण न आणता येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना पास्को कंपनीकडून न्याय मिळाला पाहिजे. कारण येथे ही कंपनी आल्यामुळे येथील भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा फायदा करायचा की येथील काही मूठभर लोकांचा फायदा करायचा याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे,” असं दरेकर यांनी सांगितलं.
माणगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण सुरेश पाटील यांची प्रविण दरेकर यांनी भेट घेतली. भूमिपुत्रांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. हा विषय पोलीस, प्रांत, स्थानिक भूमिपुत्र व पास्को कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने सोडविण्याच्या सूचना दरेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येथे कोणाचीही दादागिरी व गुंडगिरी चालू देणार नाही. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे कोणाच्या दबावाला बळी न पडाता दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव रवि मुंडे,भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते, सरचिटणीस बिपिन महामुणकर, तालुकाध्यक्ष आप्पा ढवळे, नाना महाले, राजेश मपारा तसेच उपोषणकर्ते प्रकाश जंगम, परशुराम कोदे, ज्ञानेश्र्वर उतेकर, संतोष पोळेकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :