कोल्हापूर: आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण आपोआप मिटेल, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाई केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याशी अजित पवार यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी ‘ईडी’च्या कारवाईच्या टायमिंगसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. (Raju Shetty on jarandeshwar sugar factory ED action)
ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपकडून तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला जात असल्याबद्दल टीका केली. गेल्या पाच वर्षांपासून ईडी झोपली होती का? मी कोणालाही सर्टिफिकेट द्यायला आलो नाही. मात्र, जरंडेश्वर साखर कारखान्यावर राजकीय हेतूनेच कारवाई केली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रानंतर ही कारवाई झाली. चंद्रकांतदादा हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. आता त्यांनी इतर कारखान्यासंदर्भातही अशीच पत्रे लिहावीत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवरही टीका केलीय.
सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो. ईडी एकप्रकारे राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. 5 वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. मात्र, आता ही कारवाई करण्यात आली! याचा अर्थ ईडीला कुणीतरी सांगत आहे, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतो, म्हणून त्याचा काटा काढायचा आहे, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केलाय.
संबंधित बातम्या:
काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय?
जरंडेश्वर तर हिमनगाचे टोक, अमित शाहांना पत्र लिहितोय, एक एक नाव समोर येईल : चंद्रकांत पाटील
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, ED ची कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांनी काय सांगितलं?
(Raju Shetty on jarandeshwar sugar factory ED action)