अमरावती: त्रिपुरातील घटनेचे आज दुसऱ्या दिवशीही अमरावतीत तणाव आहे. भाजपने अमरावती बंदची हाक दिलेली असतानाच आज शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली. अनेकजण तोंडाला रुमाल बांधून आले होते. तर काहींच्या हातात काठ्या होत्या. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत या तरुणांनी तोडफोड केल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता.
त्रिपुरातील घटनेच्या काल मुस्लिम समुदायांनी अमरावतीत आंदोलन केलं होतं. मुस्लिमांनी दगडफेक केल्याने अमरावतीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध म्हणून आज अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, आज सकाळी राजकमल चौक आणि गांधी चौकात अचानक शकेडो तरुण जमले. तोंडाला रुमाल आणि हातात काठ्या घेऊन आलेल्या या तरुणांनी संपूर्ण परिसरात जोरदार दगडफेक केली. या जमावाने दुकानांचीही तोडफोक करत जबरदस्तीने दुकाने बंद केली. हल्ला करणारे तरुण जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत असले तरी हे तरुण कोण होते हे समजू शकले नाही. आंदोलकांचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे का हेही समजू शकले नाही.
तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.
दरम्यान, काल त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समुदायांनी केलेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज अमरावती बंदची हाक दिली होती. दुकानदारांना दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. सकाळपासून शहरात तणावपूर्ण शांतता होती. मात्र, सकाळी 10 वाजल्यानंतर अचानक एक जमाव राजकमल चौकात दाखल होऊन या जमावाने प्रचंड दगडफेक करण्यास सुरुवात केल्याने शहरात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
कालच्या घटनेच्या आणि भाजपच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. शहरात एकूण 400 पोलीस तैनात आहेत. दरम्यान, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सात जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
संबंधित बातम्या:
रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा