नंदुरबार : गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. कर्मचारी संपावर असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. याचा फायदा आता खसगी वाहतूकदारांना होताना दिसत आहे. एसटी बस सेवा बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू असून, भाड्यामध्ये तब्बल दीडपटीने वाढ करण्यात आली आहे. दीडपट भाडे देऊन देखील बऱ्याच वेळा वाहन वेळेवर मिळत नसल्याचे प्रवाशांनी सांगीतले.
दरम्यान ग्रामीण भागांमध्ये तर याहीपेक्षा वाईट अवस्था आहे. एसटी बस हाच ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा एकमेव दुवा असतो. खासगी वाहनांना नियमीत प्रवाशी भेटत नसल्याने ग्रामीण भागात जाणे परवडत नाही. त्यामुळे ठराविक ठिकाणीच खासगी वाहतूकदारांकडून सेवा पुरवली जाते. मात्र गेल्या 15 दिवसांपासून एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वैद्यकीय किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा आणि पुन्हा एकदा बस सेवा सुरू करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासोबत कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्ज देण्यात यावा, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता यामध्ये वाढ करावी. तसेच थकीन वेतन तातडीने द्यावे अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून संप सुरू आहे. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे.
धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!
ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!