सांगली : पोलिसांना गुंगारा देऊन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवून भरविलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या बैलगाडा शर्यतीचं (Bullock Cart Race) मैदान ‘सागर-सुंदर’ या बैलजोडीने मारलं आहे. पोलिस आणि प्रशासनाची परवानगी नसतानाही ही बैलगाडा शर्यत पार पडली. पाच बैलजोड्यांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत सागर सुंदरने शर्यतीचं मैदान मारुन 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं.
“बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. पण तरीही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित होतं. पोलिसांनी आम्हाला चार ठिकाणी अडवलं. पण आम्ही इथे आलोच… रात्री 12 वाजता आम्ही इथे मैदानावर आलो.. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही बैलगाड्याची शर्यत करतोय… आज पडळकरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचं मैदान आमच्या सागर सुंदर या बैलजोडीने मारलं आहे, 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे”, अशी प्रतिक्रिया बैलजोडी मालकाने स्पर्धेनंतर बोलताना दिली.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून झरे गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. झरे गावच्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही मागे पोलिस असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. बैलगाडा शर्यत होणारच असं म्हणत पडळकरांनी पोलिस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अखेर शासन प्रशासनाला गुंगारा देत पडळकरांचा गनिमी कावा यशस्वी झाला आहे.
कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले.
झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली.
या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन मोठं राजकारण रंगलेलं होतं. बंदी असली तरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणारच, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी मांडली होती. तर आम्ही परवानगी देणार नाही, अर्थात शर्यत पार पडणार नाही, अशी भूमिका पोलिस-प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे पडळकर समर्थकांची बैलगाडा शर्यत पार पडणार की नाही, याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती. अखेर पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे. स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
“काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”
तुमच्याच समर्थकांनी ही शर्यत पार पाडली का? असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी दावा खोडून काढत, “बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, असं पडळकर म्हणाले.
(Sagar Sundar Bullock won the prize of the Bullock Cart Race competition organized by BJP MLC Gopichand Padalkar)
हे ही वाचा :