सांगली : मुसळधार पावसानंतर सांगली नजीकच्या 5 गावांसह शहराला आता महापुराबाबत एका नव्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. आतापर्यंत अलमट्टी धरणाचा सांगली शहराला फटका बसत होता. आता सांगलीनजीक निर्माण होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गमुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. जवळपास 4 किलोमीटरपर्यंतची रस्त्याची उंची 7 फुटांपासून 13 फुटांपर्यंत करण्यात आल्यानं याचा परिणाम पूर आल्यास होणार आहे (Sangli and 5 villages are in risk zone due to Ratnagiri Nagpur National highway hight).
सांगली शहराला आणि त्याच्या नजीक असणाऱ्या गावांना महापूर आल्यानंतर अलमट्टी धरणाचा बॅक वॉटरचा फटका आतापर्यंत बसल्याचं समोर आलं आहेत. 2019 नंतर वारंवार महापुराचा धोका होण्याची भीती निर्माण होत आहेत. त्यामुळे नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी बैठक घेऊन अलमट्टी धरणातून पावसाळ्यात योग्य विसर्ग ठेवण्याबाबत विनंती केली आहेत. एका बाजूला राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला सांगली शहराला आणि 5 गावांना मात्र आता एका नव्या बॅक वॉटरच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे हा धोका निर्माण झाला आहे. सांगली शहराच्या नजीक असणाऱ्या अंकली ते मिरज दरम्यान करण्यात आलेल्या रस्त्याची उंची ही जवळपास 7 ते 13 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्त्यासाठी एक प्रकारे हा घालण्यात आलेला बांध यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रात बाहेर पडणारे पाणी या ठिकाणी बसणार आहे. ते पुन्हा चांगली शहराच्या विस्तीर्ण अशा भागात पसरणार आहेत. त्यामुळे या रस्त्यामुळे बॅकवॉटरचा एक मोठा धोका भविष्यासाठी निर्माण झाल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. या विरोधात स्थानिक नागरिकांना आंदोलनाची भूमिका घेतली आहे.