मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राच्या ‘त्या’ जीआरवर पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप, पाहा काय म्हणाले?

| Updated on: Sep 11, 2023 | 4:00 PM

राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवर तोडगा काढण्यासाठी एक जीआर काढलाय. या जीआरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी दुरुस्ती सुचवली आहे. पण सरकारच्या या जीआरवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय.

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राच्या त्या जीआरवर पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप, पाहा काय म्हणाले?
prithviraj chavan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली | 11 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांचं गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षण मागे घ्यावं यासाठी सरकारने मराठवाड्यातील ज्या मराठ्यांकडे कुणबी वंशावळीचे कागदपत्र असतील त्यांना मराठा-कुणबी जातीचं जातप्रमाणपत्र दिलं जाईल, असा जीआर काढला आहे. पण मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना सरसकट मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी विनंती केलीय. दरम्यान, सरकारने मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत काढलेल्या जीआरवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप नोंदवला आहे.

“मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहे का?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. “आताच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतलाय”, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं. काँग्रेसची विटामध्ये जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

पृथ्वीराज चव्हाणांंचं अजित पवारांना उत्तर

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “पृथ्वीराज चव्हाणदेखील दिल्लीतून आले, मग त्यांनी का आरक्षण दिले नाही?”, असा सवाल अजित पवार यांनी केला होता. याबाबत पृथ्वाराज चव्हाण यांना विचारलं असता “आज अजितदादांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतो की मी मुख्यमंत्री असताना आपण सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते”, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

‘सरकारने मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केले’

“ज्यांच्याकडे निजाम कालीन कागदपत्रे, दाखले पुरावे आहेत त्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, असे गरीब लोक ज्यांना राहायला घर नाही ते पुरावा कुठे सांभाळत बसणार?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. “राज्य सरकारने अशा पद्धतीने आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केले आहेत”, अशी टीकादेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

“सरकार आज निजामकालीन कागदपत्र, पुरावे दाखले ग्राह्य धरते. पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही? हा कोणता न्याय आहे?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. “आता दिल्लीमध्येही भाजप सरकार आणि महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.