गौतमी पाटील हिचा चाहत्यांना मोलाचा संदेश, प्रेक्षक तिचं ऐकणार का?

| Updated on: May 16, 2023 | 12:05 AM

गौतमीच्या कार्यक्रमावेळी गर्दीमध्ये राडा होण्याच्या घटना घडतात. तर छतावरुन प्रेक्षक खाली पडतात. कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीत काही अनपेक्षित घटना घडतात. या घटनांच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटील हिने आपल्या चाहत्यांना मोलाचा संदेश दिला आहे.

गौतमी पाटील हिचा चाहत्यांना मोलाचा संदेश, प्रेक्षक तिचं ऐकणार का?
Follow us on

मुंबई : डान्सर गौतमी पाटील हिची महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये प्रचंड क्रेझ पसरली आहे. तिच्या कार्यक्रमाला शेकडो तरुणांची गर्दी जमते. विशेष म्हणजे गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली आहे. असं असलं तरीही तिच्या कार्यक्रमात काही अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते. गर्दीमध्ये राडा होण्याच्या घटना घडतात. तर छतावरुन प्रेक्षक खाली पडतात. कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीत काही अनपेक्षित घटना घडण्यास सुरुवात झाली किंवा गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपयश येऊ लागली की, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही केला जातो. या घटनांवर गौतमीने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने आपल्या प्रेक्षकांना मोलाचं आवाहन केलं.

“माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत. थोडंफार होतं. पण ते पुढे वाढवलं जातं. त्यामुळे काहीतरी चर्चा होते. माझ्या कार्यक्रमाला या, कार्यक्रम इन्जॉय करा”, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं.

बार्शीत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

दरम्यान, गौतमी पाटील हिच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली. यावरही गौतमीने प्रतिक्रिया दिली. “मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असं घडलं नाहीय की, लेट गेले आणि उशिराने कार्यक्रम सुरु झालाय. मी वेळेत पोहोचले होते. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. ते मला म्हटले दहाला कार्यक्रम बंद करा. तर मी दहा वाजता कार्यक्रम बंद करणारच आहे. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

“प्रेक्षकांचं प्रेम आहे. मला संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतोय. या गोष्टीचं खूप छान वाटतंय. मी इतकंच म्हणते की, असंच प्रेम कायम राहूद्या. आमच्या कार्यक्रमात आता महिला वर्गही यायला लागला आहे. त्यामुळे जास्त छान वाटतं”, असं गौतमी पाटील म्हणाली. “प्रेक्षकांनीच मला प्रेम दिलं आहे. सबसे पाटील गौतमी पाटील असं मला प्रेक्षकांनीच नाव दिलं आहे. त्यांनी मला इथपर्यंत आणलं, हे त्यांचेच उपकार आहेत”, असं गौतमी पाटील म्हणाली. दरम्यान, बार्शीतल्या प्रकरणावर पुन्हा प्रश्न विचारण्यात आला असता, “मी वेळेत पोहोचले होते. पण मी जास्त बोलू शकत नाही. कारण मी पूर्ण माहिती घेतलेली नाही. मी सगळा विषय जाणून घेईन”, असं गौतमी पाटीलने सांगितलं.

लग्न कधी करणार?

“अजून लवकर लग्न करणार नाही. कारण आताच सुरुवात झालीय. एवढ्या लवकर लग्न करणार नाही. ज्यावेळेस लग्न ठरेल आणि करायचा विचार करेन त्यावेळी तुम्हाला नक्की सांगेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

उदयनराजेंची भेट का घेतली?

गौतमीने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीवरही गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली. “उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादासाठी त्यांना भेटले. त्यांना दोन मिनिटे भेटले आणि कार्यक्रमाला आले”, असं गौतमीने सांगितलं.