अकोला: अमरावतीपाठोपाठ अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्रिपुरातीली हिंसक घटनेचे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पडसाद उमटले. अमरावती, नांदेड, परभणी, भिवंडी, मालेगावमध्ये या घटनेचे अधिक हिंसक पडसाद उमटले. अमरावतीत तर सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू होता. त्यामुळे अमरावतीत कालच चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे भाग वगळता राज्यात सर्वत्र शांतता होती. अकोला जिल्ह्यातही सर्वत्र शांतता असतानाच अकोला जिल्ह्याती अकोटमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. काल अकोट शहरातील हनुमान नगर आणि नवगाजी प्लॉट येथे दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन अकोट उपविभागीय अधिकाऱ्याने अकोटमध्ये 13 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 14 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत आरोग्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच कुणालाही या कालावधीत बाहेर फिरता येणार नाही. शिवाय पाचपेक्षा अधिक लोकं एकत्रं आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, अमरावतीत काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचाराबाबतच्या कोणत्याही अफवा पसरून पुन्हा हिंसाचार उसळू नये म्हणून अमरावतीत इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून कोणताही अपप्रचार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंद झाल्याने नेटकरी चांगलेच परेशान झाले आहेत. दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रं आलेले दिसल्यास त्यांना अटक केली जाणार आहे. चार दिवस ही संचारबंदी लागू राहणार आहे. नागरिकांनी बाहेर फिरू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी आणि संवेदनशील भागात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. अर्धा किलोमीटरपर्यंतही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
>> पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई
>> कुणालाही विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही
>> वैद्यकीय कारण असेल तरच घराबाहेर पडता येईल
>> अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई होणार
>> जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त संचारबंदी लागू करु शकतात.
दरम्यान, अमरावतीतील कालच्या बंदमध्ये भाजपचे नेतेही सहभागी झाले होते. माजी कृषी मंत्री अनिल बोंडेही या बंदमध्ये सहभागी झाले होते. पोलिसांकडून भाजपच्या या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या महिला अध्यक्ष निवेदिता चौधरी तर भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
VIDEO : 36 जिल्हे 50 बातम्या | 14 November 2021https://t.co/uh7UMS8RYO#36JILHE50BATMYA #36district50news #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021
संबंधित बातम्या:
गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?