सोलापूर : शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे दोन गट पडले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही आपले सवतेसुभे उभारले. मात्र, या फुटीत होरपळला गेला तो सामान्य शिवसैनिक. त्याला कुठे जावं हाच प्रश्न पडलेला आहे. मराठी माणसासाठी उभी राहिलेली शिवसेना कधीही त्याच्यासाठी हक्काने उभी राहायची. त्यांच्या सुख-दु:खात शिवसेना नेते धावून जायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज गेल्या तीन साडेतीन वर्षापासून राज्यात शिवसेनेचं सरकार आहे. पण शिवसैनिकाला काहीच मदत मिळताना दिसत नाहीये. दोन वर्षापासून अंथरूणाला खिळून असलेल्या एका शिवसैनिकाची कैफियत ऐकल्यावर याची चटकन जाणीव होते.
सोलापुरातील अंथरुणाला खिळून असलेल्या एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीची विनवणी केली आहे. एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांची शिवसेनेकडे औषधोपच्या मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. कामतकर हे मनक्याच्या आजारामुळे दोन वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत. ते एसटी कामगार सेनेचे माजी पदाधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आर्थिक मदत न देता केवळ औषधोपचाराचा खर्च द्यावा अशी मागणी कामतकर यांनी केली आहे. मी बरा झाल्यानंतर काम करून आपले सर्व पैसे परत देईन. त्यामुळे आता मला माझ्या पायावर उभे करा. मी आपल्याकडे भीक मागत नसून मदत मागत आहे, असं अरुण कामतकर यांनी म्हटलं आहे.
मी एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव म्हणून 5 वर्षे काम केले. मात्र आता मी अडचणीत आहे. माझ्या अडचणीच्या काळात शिवसैनिकाला मदत करा, ही विनंती आहे. मी मदतीसाठी एकनाथ शिंदे यांच्या एका जवळच्या व्यक्तीसह भाजप आमदार विजयकुमार देशमुख, मनसेचे विनायक महिंद्रकर यांनाही मदत मागितली. मात्र या सर्वांकडून केवळ मला आश्वासनेच मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या विनंती आहे की, मला केवळ आयुर्वेदिक औषधोपचार द्यावा. आर्थिक स्वरूपात मदत नको, अशी कळकळीची विनंतीही या शिवसैनिकाने केली आहे.
मी हाडाचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी कोणाकडेही भीक मागणार नाही. फक्त मदत मागतोय. सरकार ज्या योजना आणतेय, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात का हे मुख्यमंत्र्यांनी पाहावं. जर सत्ता असूनही शिवसैनिकाची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय? शिवसेनेचे माजी मंत्री साबीर शेख यांना देखील अशाच अडचणीला सामोरे जावे लागले होते. शेवटच्या काळात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या दफन विधीचा खर्च रामदास आठवले यांनी केला होता. त्यामुळे आता सत्ता आल्यावर तरी किमान आपल्या शिवसैनिकांना मदत करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.