जळगाव: जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकनाथ खडसे यांनी जुन्या व्हायरल ऑडिओ क्लिपचा प्रश्न उपस्थित केला होता. आमदाराच्या ड्रायव्हरची एका महिलेसोबतची अश्लील ऑडिओ क्लिप असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांचे संतुलन बिघडले आहे. खडसे यांची मुलगी मारण्याची भाषा करते. मधल्या काळात ही खडसेंनी माझ्यावर खोटेनाटे आरोप केले होते. त्यांची परिस्थिती चोरासारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. खडसेंनी एका महिलेबाबत भाषणात अपशब्द वापरला. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत कलम 509 खाली गुन्हा दाखल आहे. 30 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता. पण तुमच्या सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राला लोकप्रिय झाला नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
खडसेंचा पोलिसांवर दबाव आहे. दबावाचे राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची नीती खडसे कुटुंबीयांची आहे. कोणती ऑडिओ क्लिप दाखवता? ऑडिओ क्लिपशी माझा संबंध असला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हानच त्यांनी खडसेंना दिलं आहे.
दरम्यान, खडसे यांनी एका आमदाराच्या ड्रायव्हरचे महिलेशी अश्लील संबंध असल्याची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत. आम्ही याबाबत तक्रार केल्यामुळे आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. यातूनच ते निरर्थक आरोप करत आहेत आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नसून कोण गुन्हेगारी वृत्तीचा आहे हे जनतेला माहिती आहे, असा हल्ला खडसेंनी लगावला होता.
दरम्यान, रोहिणी खडसे यांनीही पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. माता जिजाऊंच्या आम्ही लेकी आहोत. त्यामुळे एखाद्या महिलेच्या अंगावर जर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न करत असेल ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. महिलांवर अत्याचार कोणी करत असतील तर मी त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी वेळीच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना रोखावे. पाटील यांनी घटनेचा विपर्यास न करता गंभीरतेने हे प्रकरण घ्यावे. कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजून सांगावे एवढीच त्यांना विनंती करते, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
जळगावात महाविकास आघाडीत बिघाडी, खडसे कुटुंबाकडून जीवाला धोका, चंद्रकांत पाटलांचा दावा; महिलांच्या प्रश्नावरुन रोहिणी खडसेंची चोप देण्याची भाषाhttps://t.co/cmpNxvKEHg#MVA | #EknathKhadse | #ChandrakantPatil | #RohiniKhadse
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2021
संबंधित बातम्या:
Gopichand Padalkar : जयंत पाटील, सांगलीचे SP माझ्या हत्येच्या कटात सामील, गोपीचंद पडळकरांचा आरोप
पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल