Nilesh Rane | भाजपमधील ‘या’ बड्या नेत्याला वैतागून निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्ती?

| Updated on: Oct 24, 2023 | 4:21 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी आज ट्विटरवर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटरवर आपण आजपासून राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोकणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Nilesh Rane | भाजपमधील या बड्या नेत्याला वैतागून निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्ती?
nilesh rane
Follow us on

सिंधुदुर्ग | 24 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे कोकणातील डॅशिंग नेते निलेश राणे यांनी आज अचानक राजकारणातील निवृत्ती जाहीर केलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. निलेश राणे हे भाजपचे आक्रमक नेते आहेत. ते माजी खासदार आहेत. ते त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात. पण त्यांनी अचानक आपल्या अधिकृत ट्विटर (X) अकाउंटवर राजकारणातून कायमची निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर निलेश राणे यांना पक्षातील नेमका कुणाचा त्रास होता? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण आलंय.

भाजपचे दिग्गज नेते रविंद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे निलेश राणे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सध्या पालकमंत्री आहेत. तसेच ते आगामी लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करत आहेत. यामुळेच निलेश राणे हे नाराज असल्याची चर्चा आहे. निलेश राणे हे कधीच कुणासमोर झुकणारे असे नेते नाहीत. पण पक्षातील मतभेदांमुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

निलेश राणे यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यात काही दिवसांपासून मतभेद आहेत. रविंद्र चव्हाण यांच्याकडून मालवण येथील अनेक विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांकडून सातत्याने निलेश राणे यांना सापत्न वागणूक दिली जात होती, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे रविंद्र चव्हाण यांची ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासोबत जवळीक वाढत आहे. हेच निलेश राणे यांच्या मनाला लागल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यावेळी निलेश राणे यांच्या समर्थकांना विश्वास घेतलं गेलं नव्हतं. त्यामुळे निलेश राणे नाराज होते. कोकण भाजपमधील या अंतर्गत वादामुळे निलेश राणे यांनी अखेर राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर भाजप पक्षाकडून काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश राणे यांच्याकडून आगामी काळात मोठे गौप्यस्फोट केले जाण्याची शक्यता आहे. तसेच निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, नारायण राणे यांच्याकडून निलेश राणे यांच्यासोबत बैठक सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. नारायण राणे निलेश राणे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.