अहमदनगर / 14 ऑगस्ट 2023 : औरंगाबादहून शिर्डी, भंडारदरा येथे पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचे टायर निखळल्याने बसला अपघात झाला. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्यार्थी आणि शिक्षक बालंबाल बचावले. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंपी टोलनाक्यावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सर्व विद्यार्थी औरंगाबाद येथील तापडीया कोचिंग इन्स्टीट्युटचे विद्यार्थी आहेत. बसच्या समोरील उजव्या बाजूचा टायर निखळला आणि बस थेट टोलनाक्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या बसमध्ये 40 विद्यार्थी आणि चार ते पाच शिक्षक होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरु केले.
पिकनिक करुन बस रात्रीच्या सुमारास औरंगाबादला परतत होती. राहाता तालुक्यातील निर्मळप्रिंप्री टोलनाक्यावर येताच बसचा टायर निखळल्यने अपघात झाला. यात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर बसचा दरवाजा लॉक झाला. मात्र बसची काच फुटल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी तेथून बाहेर पडत आपली सुटका केली.
दरम्यान, स्थानिक युवकांनी तातडीने बचावकार्य करत उर्वरित विद्यार्थीनींना बसमधून बाहेर काढले. लोणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलीस आणि स्थानिक युवकांनी पर्यांयी बसची उपलब्धता करून देत विद्यार्थी तसेच शिक्षकांना औरंगाबादकडे रवाना केले. बंद पडलेला निर्मळ प्रिंपी येथील टोलनाका अपघाताला कारणीभूत ठरत असून, तेथे लाईट आणि दुभाजकांवर रिफ्लेक्टर नसल्याने अनेक अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.