लातूर : लातूर जिल्ह्यातल्या नदीवाडी गावात एका अल्पवयीन मुलीच्या डोळ्यातून तांदूळ, ज्वारी आणि दगडाचे कण निघत असल्याचा दावा कुटुंबाने केलाय. या मुलीच्या कुटुंबीयांनी हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा दावा केलाय. तसेच आश्चर्य व्यक्त केलंय. विशेष म्हणजे डोळ्यात तांदूळ, ज्वारी आणि खडे सापडत असल्याचा या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) हा वैफल्यातून घडणारा प्रकार असल्याचं मत व्यक्त केलंय.
मुलीच्या घरच्यांनी तिला नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी केली असता डॉक्टरांनी अशाप्रकारे काहीही घडत नसतं, असं स्पष्ट केलं. तसेच पीडिता किंवा अन्य कुणी तरी व्यक्ती तिच्या डोळ्यात हे तांदूळ, ज्वारी किंवा दगडाचे कण टाकत असावेत असा अंदाज व्यक्त केलाय.
मुलीचे वडील रामेश्वरी बैनगिरे म्हणाले, “माझ्या मुलीच्या डोळ्यातून पहिल्यांदा अमावस्येच्या पहिल्या दिवसापासून वाळूचे खडे निघाले. आम्ही दुसऱ्या दिवशी दवाखान्यात लातूरला गेलो. ते म्हणाले मुलगी हाताने डोळ्यात खडे घालून घेत आहे. त्यानंतर मुलीच्या डोळ्यातून तांदूळ निघण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत तांदूळ निघत आहेत. दररोज 80-100 तांदूळ डोळ्यातून निघतात. डॉक्टरांनी असं काहीही होत नाही. हे पहिल्यांदा पाहतो आहे असं सांगितलं.”
अंनिसचे राज्य सचिव माधव बावगे म्हणाले, “21 व्या शतकात अशा घटना घडत आहेत आणि त्याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धा हद्दपार व्हावी यासाठी राज्यभरात चळवळ उभारुन डोंगराएवढी काम उभं केलंय. त्यानंतरही अशा घटना घडत आहेत. आम्ही साडेपाचशेहून अधिक भानामतीची प्रकरणं हाताळली आहेत. वैफल्यग्रस्त किंवा तिरस्कारीत व्यक्ती इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे करत आहे. बाहेरुन कुणीही डोळ्यात खडे-तांदूळ टाकल्याशिवाय डोळ्यातून ते निघू शकत नाही.” विशेष म्हणजे मुलीने यामुळे डोळयाला काहीही त्रास होत नसल्याचं सांगितलं.
Superstition in Latur claiming stone and rice from eye of girl