शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : जयंत पाटील यांच्या ईडी चौकशी करून राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. स्वाभिमानी पक्ष लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे आणि राज्यात सहा ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. फक्त विरोधक म्हणून ईडी चौकशी करू नका तर सर्वांचीच चौकशी करा, त्यात माझीही चौकशी करा, मी तयार आहे. असे खुले आव्हानही शेट्टी यांनी दिले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार आहे. चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा. फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला. यामध्ये माझीसुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असा टोलाही राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्या पक्षाची युती करणार नाही. मात्र स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकणंगले मतदारसंघात उमेदवार म्हणून लढणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्यकर्ते आणि राजकारण्यांचा दुर्लक्ष झाला आहे. अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकरी आत्महत्या संकटात अडकला असताना राज्यकर्त्यांकडून कोणतीही मदत किंवा विचारपूस शेतकऱ्यांची केली जात नाही. त्यामुळे आता या राज्यकर्त्यांच्या विरोधात शेतकरी आवाज उठवेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
लोकसभा निवडणुकीला अवघे दहा महिने राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आता उमेदवारांची चाचणी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा विकास आघाडीने देखील आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला तर हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्याच्या हालचाली सुरू आहेत.