अकोला : जिल्ह्यातल्या केळीवेळी येथील घटना. संजय बदरखे (Sanjay Badarkhe) या शेतकऱ्यानं शेतात दीड एकरात कांदा लावला. हा कांदा (Onions) उपटून त्याची जवन लावण्यात आली होती. कांद्याचं जवन लावल्यावर एकवीस दिवस हे जवन ठेवावं लागतं. कांदा उपटून 17 दिवस पूर्ण झाले होते. मात्र 21 दिवस पूर्ण व्हायच्या आधीच बदरखे यांच्या शेतात अचानक आग लागली. पूर्ण कांदा जळून खाक झाला. मात्र त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. आग इतकी भीषण होती की, गावातही आगीचे लोट दिसत होते. असे गावातील नागरिक सांगत होते. गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बदरखे यांचे शेत आहे. शेतात लागलेल्या आगीमुळं संजय यांच्या डोळ्यात पाणी (Tears) आले.
अकोल्यातील संजय बदरखे यांनी दीड एकरात कांदा लावला होता. तो साठवूण ठेवला होता. पण, अचानक लागलेल्या आगीत त्यांचा संपूर्ण कांदा जळून खाक झाला. त्यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. संजय यांना या दीड एकर कांद्यामधून उत्पन्न होणार होते. या आशेवर त्यांनी स्वप्न रंगवली होती. आता या कांद्यातून मिळालेल्या पैशातून आपण कुटुंबाचा गाडा हाकणार याचे आराखडे बांधले होते. पण, हे सगळं स्वप्न धुळीस मिळाले. अचानक आग लागली. ही आग कशी लागली, याचा शोध घेतला जाईल. पंचनामा होईल. पण, झालेले नुकसान काही भरून निघणार नाही.
सध्या उन्हामुळं आगीच्या घटना वाढल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. असंच नुकसान संजय यांचं झालं. आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चार महिने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. 80 क्विंटल कांद्याकडून त्यांना मोठी अपेक्षा होती. पण, या अपेक्षिची राखरांगोळी झाली.