शंकर देवकुळे, Tv9 प्रतिनिधी, सांगली | 26 फेब्रुवाराी 2024 : लोकसभेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सांगलीमध्ये लोकसभेच्या मैदानासाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल पाटील आणि अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या तिघांनी मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील, संजय काकापाटील आणि चंद्रहार पाटील या तिघा पाटलांनी प्रचाराचा धडाका सुरू करून लोकसभा निवडणुकीत सध्या चांगलीच रंगत आणली आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उमेदवारी मिळेल याची शाश्वती अद्याप नाही. मात्र तरी देखील लोकसभेच्या निवडणुकीसाठी सध्याचे भाजप खासदार संजय काका पाटील आणि गतवेळी निवडणूक लढवलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि संभाव्य काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील, त्याचबरोबर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारीत असणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे आता डबल महाराष्ट्र केसरी पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा लोकसभेसाठी तिरंगी लढत होण्याची चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने संपर्काचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी गावागावात बैठका त्याचबरोबर गाठीभेटी यावर जोर दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे आणि गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी देखील उमेदवारी अंतिम नसली तरी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. गावागावात पदयात्रा संपर्क अभियान सुरू करून विशाल पाटलांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली.
दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीच्या मैदानासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार करत प्रत्यक्ष तशी जाहिरातबाजी देखील चंद्रहार पाटलांकडून सुरू करण्यात आली आहे. चंद्रहार पाटील काँग्रेसच्या बरोबर भाजप या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर संपर्कात आहेत. मात्र तरी देखील त्यांनी प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. एकंदरीत पाहता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील, संजय काकापाटील आणि चंद्रहार पाटील या तिघा पाटलांनी प्रचाराचा धडाका सुरू करून लोकसभा निवडणुकीत सध्या चांगलीच रंगत आणली आहे.